पोलिस ठाण्यात तक्रादारांना चांगली वागणूक मिळते का?; स्वागत कक्षाची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:57 AM2023-03-28T10:57:35+5:302023-03-28T10:57:48+5:30
मुंबईत दिवसाला हजारो तक्रारी पोलिस ठाण्यात येतात.
मुंबई : पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला चांगली वागणूक मिळावी यासाठी पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. काही कक्षात चांगला अनुभव येतो, तर काही कक्ष नावालाच असल्याचे चित्र मुंबईत आहे. तसेच बहुतांश पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणांचा वॉच आहे. काही पोलिस ठाण्यात तर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कक्षातही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती.
मुंबईत दिवसाला हजारो तक्रारी पोलिस ठाण्यात येतात. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला तक्रार करणे सोयीस्कर व्हावे यासाठी ९४ पोलिस ठाण्यात स्वागतकक्ष उभारण्यात आले. यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले होते. मुंबईत काही ठिकाणी प्रशस्त असा कक्ष तयार करण्यात आला आहे. काही पोलिस ठाण्यात टेबलला स्वागत कक्षाचा बोर्ड लावून तेथे पोलिस मार्गदर्शन करतात.
कुठे चांगली तर कुठे उर्मटपणा
काही ठिकाणी चांगली, तर काही ठिकाणी तक्रारदारांना वाईट वागणूक अनुभवाला येते. पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचेही काही तक्रारदारांचे म्हणणे आहे तर काही ठिकाणी पोलिसांकडून अपेक्षेपेक्षा जास्त चांगली वागणूक मिळत असल्याचेही तक्रारदारांचे म्हणणे आहे.
पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही
सर्व पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील घडामोडींवरदेखील लक्ष राहते.