डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:18 AM2021-09-09T08:18:52+5:302021-09-09T08:19:34+5:30
भाजप नेते आशिष शेलार; शिवसेनेचे देऊळबंदी अभियान
मुंबई : राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची, असा प्रश्न विचारणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का, या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे आव्हान भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी दिले. मुख्यमंत्र्यांची भूमिका मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत असंवेदनशीलता दाखवणारी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मंदिरे उघडू की रुग्णालये या मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर भाजप नेते शेलार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. कट कमिशन आणि वाटाघाटी हे ठाकरे सरकारचे धोरण बनले आहे. कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सॅनिटायझर वाटप, सॅनिटायझेशन या सगळ्या पुरवठाधारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरणे समोर येताहेत, यावरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य करावे. पब, रेस्टाॅरंट, डिस्को आणि बार मालकांशी वाटाघाटी झाल्या आणि ते खुले करण्याचा निर्णय झाला. एक्साईजची कमाई हवी म्हणून दारुची दुकाने उघडली, तर कामगारांचे कारण सांगून माॅल उघडे केले. मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फुले विकणाऱ्यांची होणारी उपासमार दिसत नाही का, त्यांना जगण्याचा अधिकार नाही का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकावेळी किती लोकांना प्रवेश द्यावा वगैरे नियम करुन मंदिरे उघडता येऊ शकतात. पण नारळ, अगरबत्ती, फुले विकणारे स्वतःचेच पोट भरू शकत नाहीत तर सरकारच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? या वर्गाशी वाटाघाटी होऊ शकत नाहीत, त्यामुळे मंदिरे बंद आहेत. डिस्को, पब, बारवाले वाटाघाटी करू शकतात म्हणून ते उघडले गेले. भाविक आणि देव यांची ताटातूट करण्याचे काम शिवसेना करत आहे. गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्र किंवा मंदिरे नियमात राहून सुरु करु, ही सरकारची भूमिका नाही. म्हणून हा कोरोनाबंदीचा कार्यक्रम नाही
तर हे देऊळ बंदीच शिवसेनेचे अभियान आहे, असा टोलाही शेलारांनी लगावला. काळजी घ्या पण आपला उत्सव साजरा करा, असे का
म्हणता येत नाही. केवळ सत्तेच्या मोहापाटी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला वसा यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नादाला लागून सोडला आहे, असेही ते म्हणाले.