मुंबई : आरेत सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. या बेकायदा कामाबाबत मेट्रो प्रशासनाने पोलिसात आठहून अधिक तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलीस अहवाल बनविण्यापलीकडे काहीही हालचाल करताना दिसत नसल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. त्यातच या प्रकरणी हरित लवादासमोर बुधवार तसेच गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने मेट्रो जुन्या आदेशाचा आधार घेऊन आरेत बिनदिक्कत काम करत आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणा मेट्रोसाठी काम करतात का, असा संतप्त सवालही त्यांनी सरकारला केला आहे.आरेतील जागेवर मेट्रो -३ प्रकल्पासाठी आरे कारशेडचे कोणत्याही प्रकारचे काम होणार नाही, असा हरित लवादाचा आदेश असूनही मेट्रो प्रशासन या आदेशाला हरताळ फासत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. तर, जुन्या आदेशाचा आधार घेऊन आरेतील काम सुरू असल्याचा मेट्रो प्रशासनाचा दावा आहे. आरेतील मेट्रोच्या कामाविरोधात गेल्या ४ दिवसांत पर्यावरणवादी संस्थांनी आरे पोलिसांकडे तब्बल ८ तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र पोलीस काहीही करत नसल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. तर, आरेतील बांधकाम सुरू असलेल्या जागेची पाहणी करून अहवाल तयार करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण आरे पोलिसांनी दिले.पर्यावरणवाद्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोयसरकारी यंत्रणांचे ढिसाळ कामकाज पाहता त्या मेट्रोसाठी काम करतात का, असा संतप्त सवाल सेव्ह आरेच्या सदस्या अमृता भट्टाचार्य यांनी केला आहे. सुनावणी पुढे जात असल्याने पर्यावरणवाद्यांचा वेळ आणि पैसा वाया जात असून मेट्रोचे काम मात्र बिनदिक्कत सुरू असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता याविरोधात वनशक्ती, सेव्ह आरे आणि सर्व पर्यावरणवादी संस्था एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारतील. पर्यावरणाला धोका असलेल्या आरे कारशेडचे काम दुसरीकडे हलविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही भट्टाचार्य यांनी दिला.
सरकारी यंत्रणा मेट्रोसाठी काम करतात का? पर्यावरणवाद्यांचा संतप्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 5:58 AM