मुंबईतले मॅनहोल झाकले का? जाऊन डोळ्यांनी पाहा; आयुक्तांनी अधिकाऱ्यांना लावले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:23 AM2023-08-12T11:23:52+5:302023-08-12T11:25:45+5:30
मुंबईतील मॅनहोलचे १९ जूनपूर्वी सर्वेक्षण करावे. एकही मॅनहोल उघडे राहणार नाही, याची खात्री करावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील मॅनहोल झाकले असल्याची पुन्हा एकदा खातरजमा करावी, असे निर्देश देत २० ऑगस्टपर्यंत कारवाई करून त्याची पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सादर करावे, असे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. मॅनहोल कारवाईचा पडताळणी अहवाल उच्च न्यायालयात तीन आठवड्यांच्या आत सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने न्यायालयाकडून विभागनुसार नियुक्त तज्ज्ञ वकील, तसेच संबंधित सहायक आयुक्त हे २१ ऑगस्टपासून या कामाची एकत्रित पाहणी करणार आहेत.
मुंबईतील मॅनहोलचे १९ जूनपूर्वी सर्वेक्षण करावे. एकही मॅनहोल उघडे राहणार नाही, याची खात्री करावी. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे, असे आयुक्तांनी १४ जून रोजी नमूद केले होते. आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
६ हजार ३०८ मॅनहोलवर प्रतिबंधक जाळ्या लावण्यात आल्याची खातरजमा केली जाणार आहे.