Join us

खाजगी डम्पिंग ग्राउंड आँडिट झाले का? आशिष शेलारांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल

By मनोहर कुंभेजकर | Published: May 23, 2024 4:03 PM

शेलार  यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा केला. आज त्यांनी अंधेरी, वर्सोवा येथील नाल्यांची पाहणी केली.  

मुंबई-नाल्याचा गाळ वसईतील ज्या खाजगी डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो आहे त्याचे ऑडिट करण्यात आले आहे का? असा सवाल करीत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील नालेसफाई बाबत असमाधानी असल्याचे आज सांगितले.

 शेलार  यांनी आज दुसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाचा पाहणी दौरा केला. आज त्यांनी अंधेरी, वर्सोवा येथील नाल्यांची पाहणी केली.  पश्चिम उपनगरातील इर्ला नाल्याची पाहणी केली असता अद्याप काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र पहायला मिळाले. तर जीवन नगर नाल्यात अद्याप गाळाचे थर, फ्लोटींग मटेरियल कायम असून पालिका अधिकारी सांगत असलेले आकडे आणि प्रत्यक्षातील चित्र यात तफावत दिसून आल्याचे शेलार म्हणाले.यावेळी स्थानिक नगरसेवक अभिजित सामंत आणि पदाधिकारी तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्वरित दुसऱ्या दिवसापासून भाजपची सगळी यंत्रणा आता नालेसफाईवर  लक्ष ठेवून असून मी स्वतः गझदर बांध पंपिंग स्टेशन परिसरातील नाल्याची काल पाहणी केली आणि आज या दोन नाल्यांची पाहणी केली. झालेल्या कामांबाबत आम्ही पूर्णतः समाधानी नाही. मालमत्ता करासाठी मुंबईकरांच्या खिशात हात घालणारी पालिका नाल्यात हात घालण्यात अपयशी ठरली आहे असा आरोप त्यांनी केला.

नाल्यांची खोली किती याबाबत कोणतेही परिमाण नाही नाल्यांच्या तळाचे काँक्रिटीकरण झालेले नाही, त्यामुळे त्याची खोली किती? त्यातून किती गाळ काढला? याबाबत कुठलेही परिमाण दिसून येत नाही. ही कामे उद्धव ठाकरे यांच्या काळात होणे अपेक्षित होती ती झाली नाही असेही त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे नाल्यावर का दिसत नाही ?

मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन बोलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आज कुठे आहे ? नाल्यावर का दिसत नाही ? मुंबईकरांसाठी का बोलत नाही? त्यांचे आणि मविआचं मुंबईवरील प्रेम हे पूतना मावशीचे आहे. त्यांना मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळेस आठवतो. त्याच्यासाठी काम, सेवा आणि देखरेख करताना ते परागंदा असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.