मनोहर कुंभेजकर
मुंबई: शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, नागरिकांना कोरोनाची लक्षणे आहेत का हे तपासण्यासाठी सध्या पल्स ऑक्सिमीटर हे सध्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनचे पहिल्यांदा घेतलेले रिडींग आणि मग घेतलेले रिडींग यामध्ये फरक आढळतो असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरचा दर्जा बरोबर आहे का असा सवाल करत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी पल्स ऑक्सिमीटरच्या गुणवत्तेबद्धल संशय व्यक्त केला आहे.
डॉ.दीपक सावंत यांनी आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन त्यांना पल्स ऑक्सिमीटर व सॅनिटायझरच्या गुणवत्तेबद्धल निकष ठरवण्यासंदर्भात निवेदन दिले. सध्या बाजारात 300 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत पल्स ऑक्सिमीटर मिळत असून अनेक कंपन्या त्यांची निर्मिती करतात. त्यांचा दर्जा काय असावा हे तपासून अन्न व औषध प्रशासनाने ते प्रमाणित करावे अशी सूचना देखिल त्यांनी केली आहे. झोपडपट्टीतून सॅनिटायझर निर्मितीचे कारखाने सुरू असून सॅनिटायझर सध्या कुठेही विकले जात आहे.यावर कायदेशीर कुठे विकावे यासाठी नियमावली तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. सॅनिटायझर बनवतांना त्यात अल्कोहोलचे प्रमाण किती असावे,त्याची उत्पादकता किती असावी,उत्पादन करण्या संदर्भाचा परवाना,उत्पादन व्यवस्था यासर्वांची गुणात्मक दृष्टीने तपासणी होऊन उत्तम दर्जाची उत्पादने नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी निवेदनात विषद केली आहे.
सोडियम हायपोक्लोराईड सारखी अनेक उत्पादन विशिष्ट कंटेनर मधून विकली जाणे गरजेचे आहे.तसेच व्हायरस 99 टक्के मारण्याचा दावा करणारी फ्लोअर क्लिनिंग उत्पादने बाजारात विक्रीस खूप आली आहेत.सदर क्लिनिंग उत्पादने वापरल्याने आपण कोरोनापासून सुरक्षित आहोत अशी सर्वसामान्य नागरिकांची फसगत होण्याची भीती असून त्यांच्या गुणवत्तेबद्धल शंका व्यक्त केली.