ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी, पालक तयार आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:38 AM2020-06-02T01:38:16+5:302020-06-02T01:38:39+5:30
भीतीचे वातावरण : शैक्षणिक सत्र सुरू करण्यास होत आहे विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी, पालकांसह, संस्थाचालक आणि शिक्षक, मुख्याध्यापकही भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे शाळा तर जिथे शक्य नाही तिथे डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा सरकारचा विचार असला तरी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून याला प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जुलै महिन्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरच शाळांमधील आॅनलाइन किंवा आॅफलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, त्याआधी संबंधित शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम व नियोजन स्पष्ट करावे, अशी मागणी शिक्षक, मुख्याध्यापक वर्गातून होत आहे.
पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येणार नाही, या नियमामुळे पालक व विद्यार्थी आॅनलाइन वर्गात उपस्थित राहण्यास रस दाखवित नसल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली. अशा वेळी आॅनलाइन शिक्षणाच्या ट्रेनिंगसाठी शिक्षकांना गावाहून परत येण्याच्या सूचना सत्तेतील पक्षांच्या शिक्षक संघटना शिक्षकांना करत आहेत. १५ जूनपर्यंत उपस्थित न राहिल्यास १६ जूनपासून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीतील वेतन कपात होण्याचे संकेतही शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शाळा कधी उघडणार, अभ्यासक्रम किती असणार? शैक्षणिक वर्षाचे नियोजन अस्पष्ट असताना शिक्षकांवर असा दबाव टाकणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष संपलेले असतानाही कोरोनासंबंधित जबाबदाऱ्या, दहावी-बारावी पेपर तपासणीचे कार्य, निकालपत्र तयार करणे, संचमान्यतेच्या याद्या तयार करणे अशी कामे शिक्षकांकडून करून घेणे आजही सुरू आहे. या सगळ्यातून मुक्तता होत नाही तोच मुलांना रस नसलेले आॅनलाइन शिक्षण शिक्षक व विद्यार्थ्यांवर थोपविले जात असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या मानसिकतेचा विचार करून शाळा आणि आॅनलाइन शिक्षण हे जुलैपासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
च्जे विद्यार्थी, पालक, शिक्षक गावी पोहोचले आहेत त्यांना इतक्या कमी वेळात पुन्हा आपापल्या घरी येणे शक्य नाही. तसेच शिक्षकांनाही तेथून आॅनलाइन वर्ग घेण्यास अडचणी उद्भवणार आहेत.
च्त्यामुळे शैक्षणिक वर्ष २५-३० दिवस उशिरा सुरू झाल्यास फरक पडणार नाही. त्याऐवजी विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मन:स्थितीचा विचार करून शाळा सुरू करण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.