Join us

मनोज जरांगे यांच्या मागणीला ठाकरे, पवारांचं समर्थन आहे का?; शंभुराज देसाईंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 11:37 AM

आज मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार आहे.

मुंबई-मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आता राज्य सरकारही अॅक्शनमोडवर आले आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी मंत्री शंभुराज देसाई यांनी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जरांगे पाटील यांच्या मागणीवरुन सवाल उपस्थित केला आहे. 

मराठा आंदोलनाचा उद्रेक, तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न; बोलावली सर्वपक्षीय बैठक

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीला येण्याची विनंती करतो. आरक्षणा संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन प्रश्न मिटवावा लागेल. सर्व पक्षांनी शांततेचा आवाहन केले पाहिजे. जरांगे पाटील यांची मागणी सर्वांना कुणबी दाखले देण्याची मागणी आहे, ही मागणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?, असा सवालही शंभुराज देसाई यांनी केला. 

आज सर्वपक्षीय बैठक बोलावली

राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर  जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. मराठा आंदोलनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वपक्षीय नेते हजर राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :मराठा आरक्षणशंभूराज देसाईमनोज जरांगे-पाटील