शिंदेंसोबतच्या आमदारांसाठी 'मातोश्री'ची दारं खुली आहेत का?; उद्धव ठाकरेंनी विषय मिटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:11 PM2023-07-11T14:11:33+5:302023-07-11T14:12:22+5:30
शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई- शिवसेनेत बंड होऊन एक वर्ष पूर्ण झालं, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यामुळे आता शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपद कधी मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यातील काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान, या चर्चेवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली.
Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं
उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील आमदार नाराज आहेत की नाहीत याच्याशी माझा काही संबंध नाही. अजुनही या चर्चेत काही तथ्य नाही. ही फक्त चर्चाच आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील नेते संपर्कात असल्याचे सांगितले होते, या चर्चांवर आज उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला.
'माझ्या आजारपणाची काही दिवसापासून चेष्टा करत आहेत. ते चालत, ही कोणती संस्कृती आहे. २०१४ साली असं काय घडलं की तुम्ही युती तोडली. तुम्ही म्हणाल तो देव, तुम्ही म्हणाल तो डाकू मग तुम्ही आहात कोण, असंही ठाकरे म्हणाले. सध्या कोणता खेळाडू कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही. देशाच राजकारण आयपीएल सारख झालं आहे. देशातील सर्व यंत्रणा यांच्याच आहेत. ज्यांच्या चौकशा लागल्या आहेत त्यांना क्लिन चीट मिळाल्या आहेत. आमच्या माणसांच्या मात्र घरात घुसून चौकशा करत आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी केला.
आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यामुळे आता हे मंत्रि शिंदेंच्या नाकीनऊ आले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.