लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घरात पाळलेल्या कुत्र्याचा किंवा मांजराचाही थर्ड पार्टी विमा काढता येतो. त्याने एखाद्याचा चावा घेतल्यास संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळू शकते. विमा घेण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारची पॉलिसी घेत आहोत आणि त्या पॉलिसीत सर्वकाही समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. विम्याची रक्कम विमा पॉलिसीवर अवलंबून असते. नुकसानभरपाई मिळू शकते. परंतु, सर्व माहिती आणि कागदपत्रे प्रदान करावी लागतात, अशी माहिती विमा सल्लागारांनी दिली.
अपघात - केवळ पाळीव प्राणी विमा : पाळीव प्राण्याला अपघातात दुखापत झाल्यास केवळ अपघाती पाळीव प्राणी विमा पशुवैद्यकांच्या बिलांना कव्हर करतो.
आजीवन पाळीव प्राणी विमा पॉलिसी कायम ठेवल्यास, आपले पाळीव प्राणी विमा उतरवलेले असताना होणारे अपघात, दुखापती आणि आजारांसाठी संरक्षित केले जाऊ शकतात.
जास्तीत जास्त लाभ पाळीव प्राणी विमा : अपघात आणि आजारांना प्रति स्थिती कमाल रकमेपर्यंत कव्हर करतो. मर्यादा गाठली की, पाळीव प्राणी त्या विशिष्ट स्थितीसाठी कव्हर केले जाणार नाहीत.
वेळ - मर्यादित पाळीव प्राणी विमा : आजार आणि अपघातांना कव्हर करतो. स्थितीचे निदान झाल्यापासून १२ महिन्यांपर्यंत किंवा पॉलिसीच्या मर्यादेपर्यंत ते असते.
प्राण्यांचा विमा सर्वसाधारण विम्यात येतो. ब्रँच लेव्हलवर हा विमा उतरविला जात नाही तर लोकल लेव्हलवर असलेल्या कार्यालयात हा विमा उतरविला जातो. विमा उतरवताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते.
८ महिन्यांपासून ८ वर्षांपर्यंतच्या कुत्र्याचा विमा उतरविता येतो. यात कोपे असतो. कोपे म्हणजे कुत्र्याला काही दुखापत झाली. त्याची शस्त्रक्रिया करावी लागली. कुत्रा किंवा मांजर आजारी पडले तर त्यांच्या उपचाराचा खर्च काही बाबतीत ३० ते ४० हजारही असू शकतो. या खर्चातील २० टक्के रक्कम ही मालकाने उचलली पाहिजे. ८० टक्के रकमेचा विमा मिळतो. कुत्रा-मांजरीची प्रजात बघितली जाते. लसीकरणाची माहिती विमा काढताना प्राण्यांच्या डॉक्टरने दिली आहे की नाही? त्याची नोंद होते. - नीलेश शेळके, विमा सल्लागार
पाळीव कुत्र्यांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. विमा पॉलिसीच्या विविध एजन्सी आहेत. विमा पॉलिसी कंपनीला सर्व संबंधित पुरावे प्रदान करावे लागतात. ते त्याची पडताळणी करतात. जर तुमच्या कुत्र्याने एखाद्याला दुखापत केली किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले तर विमा त्यांनी तुमच्याविरुद्ध दावा केल्यास तुम्हाला संरक्षण मिळू शकते. - सुनिष सुब्रमण्यन कुंजु, मानद प्राणी कल्याण अधिकारी