धमक्यांचे आलेले फोन खरे आहेत का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:25 AM2020-09-08T01:25:49+5:302020-09-08T06:57:11+5:30
अभिनेत्री कंगना रनौतला केंद्र सरकारने वाय सुरक्षा दिली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या तिघांना धमकीचे फोन आले आहेत. हे फोन खरे आहेत की कुणी जाणीवपूर्वक करत आहे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना धमकीचे फोन आले, त्यांची प्रशासनाने विशेषत: पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अभिनेत्री कंगना रनौतला केंद्र सरकारने वाय सुरक्षा दिली आहे. यावर फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, आपण लोकशाही आणि संविधानाला मानतो तर कुठल्याही व्यक्तीचे जीवन, त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. कंगनाने जे वक्तव्य केले त्याचे आम्ही समर्थन करत नाही, पण ती मुंबईत येत असेल तर तिच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच आहे.
कायद्याच्या राज्यात काही वेळा जे अतिरेकी होते त्यांच्यावरही हल्ला होऊ नये म्हणून आपल्याला सुरक्षा द्यावी लागते. कंगना तर कलाकार आहे. तिने चुकीचे वक्तव्य केले असेल म्हणून सुरक्षा देणार नाही किंवा तिच्यावर हल्ला करू, अशी भूमिका कुणालाही घेता येणार नाही. संविधानाने ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या पार पाडल्या पाहिजेत, पण कंगनाने जे वक्तव्य केले आहे त्याचा निषेध नक्कीच केला पाहिजे, असे ते म्हणाले.
विधान परिषद उपसभापतीपद एकमताने करावे, अशी आमचीही भूमिका होती. पुढच्या अधिवेशनातही ते करता आले असते. पण सदस्यांचा जाणीवपूर्वक मतदानाचा हक्क डावलून अशाप्रकारे लोकशाहीत निर्णय थोपण्याचे काम हे सरकार करत आहे, असे फडणवीस म्हणाले.