Join us

महामुलाखत: मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 9:25 PM

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली.

मुंबई-

'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली. रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पाटेकर यांनी मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला. मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारला आणि सभागृहात टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. नानांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर देताना खरंतर २०१९ साली जो मतदारांचा सन्मान केला गेला पाहिजे होता. तो सन्मान आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला. कारण मतदारांनी निवडणुकीत युतीला कौल दिला होता आणि आम्ही आज जनतेच्या मताचा मान राखला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं. "आमची किंमत तुमच्या भरवशावर ठरते आणि तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील?", असं फडणवीस म्हणाले. "तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून लढलो. भाजपाचे १०६ आमदार आले आणि आमचे ५६ आले. तुम्हालाही वाटलं असेल तर जनतेनं दिलेल्या कौलानुसार सरकार अस्तित्वात येईल. पण तसं झालं नाही. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी आम्ही जनतेच्या मताचा आदर करत निर्णय घेतला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

२०१९ ची चूक सुधरायला अडीच वर्ष का लागली? नानांच्या खोचक प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

अडीच वर्ष निर्णयाला का लागली?"प्रत्येक गोष्टीला योग, वेळ आणि काळ यावा लागतो. मध्यंतरी कोविड होता. त्या काळात असा काही निर्णय घेतला असता तर आम्हालाच बोललं गेलं असतं. पण त्यावेळीही आम्ही समजूत काढत होतो. आमच्या भावना सांगत होतो. पण आम्हाला यश आलं नाही. त्यामुळे तुमच्या मतांचा आदर आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेनाना पाटेकरलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022