श्वान दत्तक घेत आहात? सावधान!

By Admin | Published: March 29, 2017 06:07 AM2017-03-29T06:07:32+5:302017-03-29T06:07:32+5:30

आॅनलाइन संस्थेकडून श्वान दत्तक घेऊन प्रेयसीला भेट देण्याची इच्छा एका मालिका निर्मात्याला भलतीच महागात पडली आहे.

Are you adopting a dog? Be careful! | श्वान दत्तक घेत आहात? सावधान!

श्वान दत्तक घेत आहात? सावधान!

googlenewsNext

मुंबई : आॅनलाइन संस्थेकडून श्वान दत्तक घेऊन प्रेयसीला भेट देण्याची इच्छा एका मालिका निर्मात्याला भलतीच महागात पडली आहे. प्रणय नैथानी असे त्यांचे नाव असून या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यासह सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे तुम्हीही आॅनलाइन श्वान दत्तक घेत असाल तर नक्कीच विचार करा, असे आवाहन मुंबई पोलीस करत आहेत.
नैथानी हे एका नामांकित टेलिफिल्म कंपनीत निर्माता म्हणून काम करतात. प्रेयसीला श्वान भेट देण्यासाठी त्यांनी आॅनलाइन माहिती मिळविण्यास सुरुवात केली. तेव्हा लखनऊचे एक एनआरआय दाम्पत्य क्रिस्टन लोपीज आणि गोलोवीन प्रशांत यांनी त्यांच्याकडील श्वान कोणीतरी दत्तक घ्यावे म्हणून जाहिरात दिली होती. जाहिरात पाहून नैथानी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा या दाम्पत्याने श्वानाला विमानाने मुंबईत पाठविण्यासाठी सुरुवातीला ६ हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार नैथानी यांनी ते आॅनलाइन पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी श्वानाला त्रास झाल्याने त्याला विमानात पाठविणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. पुन्हा श्वानाच्या प्रकृतीचे कारण पुढे करत त्यांच्याकडून एकूण २६ हजार ५०० रुपये उकळले.
मात्र पैसे देऊनही दाम्पत्य श्वान देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याने नैथानी यांना संशय आला. तसेच दाम्पत्याने त्यांच्याशी संपर्कही तोडला. याची अधिक माहिती गोळा करत असताना या दाम्पत्याने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली.
यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नैथानी यांनी अंबोली पोलिसांसह सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे आॅनलाइन श्वान दत्तक घेतेवेळी सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Are you adopting a dog? Be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.