मुंबई- मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आज ठाकरे गटाने महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार आरोप करत टीका केली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज दिलं.
"...त्यादिवशी फाईल घेऊन पोलिसांसह आम्ही आत घुसणार!"; आदित्य ठाकरे यांचा थेट इशारा
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिका क्षेत्रात ४०० किमीचे रस्ते आम्ही खड्डेमुक्त करू अशी घोषणा त्यांनी केली. यासाठी त्यांचे पाच काँट्रॅक्टर मित्र आहेत, त्यांना पाच पॉकेट बनविण्यात आले. ती कामे वाटण्यात आली. ५००० कोटींची टेंडर काढली पण त्यांच्या या मित्रांनी भरली नाहीत म्हणून ती रद्द करण्यात आली. पालिका आयुक्तांना फोन केला ५००० हजारात काय होणार आहे, एक हजाराने वाढवा. आयुक्तांनी पुन्हा टेंडर काढले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 'मी दोन पत्रकार परिषदा घेतल्या तेव्हा पहिल्यांदा ४०० कोटी आणि नंतर ६०० कोटी रुपये अडविण्यात आले. शिवसेनेने पत्रकार परिषदा घेतल्या तेव्हा मुंबईकरांचे १००० कोटी वाचले. आता त्यांनी ४०० किमी नाही तर पन्नास रस्ते बनविण्याची घोषणा केली. मे मध्ये सांगितले होते. जानेवारीत हे काम सुरु करणार होते. मग कुठचे काम तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. मी जेव्हा हे बोललो. तेव्हा भाजपाने, मिंधे गटाने टीका केली. मला पप्पू म्हणताय ना मी तुम्हाला पप्पू बनून चॅलेंज देतोय. या अंगावर ५० रस्तेही तुम्ही पूर्ण करू शकत नाही, असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं.
आदित्य ठाकरे म्हणाले,'आम्ही या मुंबईत मेहनत केलीय. गेली १० वर्षे मी नगरसेवक, महापौरांसोबत फिरलो. आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारलेत. मला मेंटली चॅलेन्ज असलेले म्हटले गेले. आता मी जे बोललेलो ते खरे होतेय. आज मिंधे सरकार एकसुद्धा रस्ता पूर्ण करू शकलेले नाही, असंही ठाकरे म्हणाले. काय चाललेय, मुंबईसाठी काम करताय की खोके सरकारसाठी करताय. ज्या दिवशी आमचे सरकार येईल, त्या दिवशी पहिले काम मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
'हा उघड घोटाळा आहे. जेवढा भयानक आहे, कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे बंधूच जे नगरसेवक होते त्यांनी सांगितलेय की त्यांच्या मतदारसंघात एकही काम सुरु झालेले नाहीय. मकरंद नार्वेकर हे सांगत आहेत. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे असे सांगत आहेत. मग या सरकारचा पाठिंबा काढून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. 'दुसरा घोटाळा खडी घोटाळ्याचा झाला आहे. दिलाई रोडवर मी अधिकारी, कामगारांशी बोलत होतो. गेल्या महिन्यात जेवढे काम झालेय तेवढेच या महिन्यात कसे असे मी विचारले. यावर त्यांनी जी खडी यायची होती ती आलेलीच नाहीय. अलिबाबा आहेत त्यांच्या निकटवर्तीयांनी तिथे दमदाटी केली, त्या कंपनीचे नाव स्वराज्य आहे. जिथे हे स्टोन क्रशर असतात तिथे तयार होणारी खडी बंद झालेली. या कंपनीने दमदाटी केलेली. महसूल खात्यातून दमदाटी केली गेली. या कंपनीसोबतच करार करा नाहीतर मुंबईला खडी पाठवू शकणार नाही असे सांगितले गेले होते. मुंबईची प्रगती रोखायची आहे, मुंबईचे रस्ते रोखायचे आहे, बुलेट ट्रेन होईस्तोवर मुंबईती प्रगती रोखायची असे यांनी ठरविले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.