एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करणार आहात की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:36 AM2023-02-15T07:36:18+5:302023-02-15T07:37:01+5:30

कामगार संघटनेने दाखल केली अवमान याचिका

Are you going to pay the wages of ST employees or not? | एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करणार आहात की नाही?

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन करणार आहात की नाही?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  एसटी कर्मचाऱ्यांना १४ तारीख उलटली तरी वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. एसटी कामगार संघटनेने एसटी महामंडळाचे  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना  मंगळवारी अवमान याचिकेची नोटीस दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला ७ ते १० तारखेपर्यंत वेतन देण्यात येईल, असे तत्कालीन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. तसेच दर महिन्याला वेतनाकरिता राज्य सरकार ३६० कोटी रुपये देईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एसटीला  दर महिन्याला ३६० कोटी देण्यात येत नाहीत. जानेवारी महिन्याचे वेतन आणि पूर्वीची देणी असे एकूण १ हजार ६२ कोटींची मागणी एसटीने राज्य सरकारकडे केली होती. परंतु अर्थखात्याने निधी देण्यापूर्वी आतापर्यंत दिलेल्या निधीचे विवरण पत्र सादर करण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत. त्यानुसार महामंडळाने मंगळवारी अर्थ खात्याला विवरण पत्र दिले आहे. त्यावर आता चर्चा होईल. त्यानंतरच महामंडळाला निधी मिळणार की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

...तर ‘फौजदारी स्वरूपाची अवमान याचिका 
कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारीचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे तातडीने वेतन द्यावे अन्यथा  न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी  अवमान याचिका दाखल करावी लागेल अशी नोटीस मंगळवारी दिली आहे. बुधवारी जर वेतन झाले नाही तर फौजदारी स्वरूपाची  अवमान याचिका दाखल करणार असल्याचे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title: Are you going to pay the wages of ST employees or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.