नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी लाखो रुपये मोजत महागडे पब्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आली आहे. मात्र, बुकिंग फुल झाल्याने किंवा परवडत नसल्याने बाहेर न जाता इमारतीच्या टेरेसवरच पार्टी आयोजित करण्याचेही प्लानिंग सुरू आहे. मात्र, हे करताना स्थानिक पोलिसांची परवानगी नक्की घ्या, अन्यथा तुमच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो.
परवानगी १२.३० वाजेपर्यंतच!थर्टी फर्स्टसाठीच्या टेरेस पार्ट्यांसाठी याआधी १२.३० तर इनडोअर पार्ट्या पहाटे ५ वाजेपर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी वेळेची मर्यादा काही तासांसाठी वाढवण्यात यावी, अशीही मागणी नागरिक करत आहेत.
'त्या' रात्रीची दहशत अजूनही कायम!खार येथे ३१ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ च्या दरम्यान भगवती हाइट्स या इमारतीच्या टेरेसवर नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीत जान्हवी कुकरेजा(२१) हिची तिच्याच मित्र-मैत्रिणीकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली होती. त्या रात्रीची दहशत आजही कायम आहे.
मुंबई उपनगरामध्ये बऱ्याच सोसायटीचे टेरेस बंद आहेत. एखादी अनोळखी व्यक्ती चुकीच्या उद्देशाने आत प्रवेश करण्याची शक्यता असते. एखादी अप्रिय घटना घडल्यास सगळी जबाबदारी सोसायटी सेक्रेटरीवर येऊ शकते. पार्टीत म्युझिक वाजविण्यासाठी पोलिसांच्या परवानहीसह सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे टेरेसवर पार्टीसाठी परवानगी मिळण्यासाठी अडथळे येतात. - अॅड. नम्रता नितीन सावंत, सल्लागार
आम्ही लक्ष ठेवूच!- जुहू, वर्सोवा, वांद्रे बँडस्टँड, वरळी सी-फेस, मरिन ड्राइव्ह आणि गोराई येथील समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांची विशेष टीम तैनात करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळा तरुणाई अशा ठिकाणी अमली पदार्थांचेही सेवन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. - त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडून नवीन वर्षाच्या आनंदाला गालबोट लागू शकते. परिणामी, आम्ही टेरेस आणि इतर ठिकाणी होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवून आहोत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.