मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांनी सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असे म्हणत राज्यात पोलीस भरती कधी करणार ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.
राज्य पोलीस दलामार्फत होणाऱ्या पोलीस भरतीसाठी कॉलेजचे विद्यार्थी तयारी करत आहेत, पण भरतीच नाही, असेही अजित पवार यांनी म्हटलंय. गेल्या 5 वर्षांत कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. गुंडगिरी, अत्याचाराला आळा बसण्यासाठी लागणारं पोलीस बळ गृहखात्याकडे नाही. कारण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पोलीस भर्तीच केली नाही. हजारो इच्छुक असूनही फक्त राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे भर्तीची प्रक्रिया न होणं निराशाजनक आहे, असे अजित पवार यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दैनंदिन प्रश्न अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मात्र, काही दिवसांतच विधानसभा निवडणुका जाहीर होतील, त्यामुळे या सरकारच्या कार्यकाळात पोलीस भरती होईल ही शक्यता धुसरच वाटते.
दरम्यान, पक्षांतराच्या मुद्द्यावरुनही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केले. आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच कोणते जुने नेते नाराज आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.