मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करुन पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे, सातत्याने त्यांना ह्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले जातात, त्यांना ट्रोल केलं जातं. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्यांच्या असलेल्या मैत्रीचाही उल्लेख मीडियात आणि राजकारणात होत असतो. त्याच अनुषंगाने अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, बिनधास्तपणे उत्तर देत, राजकीय जीवनात माझे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत, असे त्यांनी म्हटले.
अजित पवार यांची एबीपी माझा वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत स्थापन केलेल्या सरकारबद्दल आणि आजही फडणवीसांसोबत असलेल्या मैत्रीबद्दल अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण आपले काम करत रहायचे. बोलणाऱ्यामुळे काय भोके पडत नाहीत. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार बनविले होते, त्यावरून माझ्यावर लोक संशय घेत असतील. काही गैरसमज निर्माणासाठी बोलत असतात. ते पहाटेचे सरकार नव्हते, ते सकाळचे सरकार होते. मी पाच, चार वाजता पहाट म्हणतो, असेही पवार म्हणाले.
मी राजकीय जीवनात सगळ्यांशीच चांगले संबंध ठेवतो. आम्ही काय एकमेकांचा बांध रेटलेला नाही, आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यांची विचारधारा वेगळीय, माझा विचाधारा वेगळीय, माझे नेते वेगळेत, त्यांचे नेते वेगळेत, त्यांचा पक्ष वेगळाय, माझा पक्ष वेगळाय, असे उत्तर अजित पवार यांनी दिलं. यावेळी, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत यापूर्वी कधी संबंध आला नव्हता, पण गेल्या अडीच वर्षांच्या काळात आमच्या दोघांमध्ये कधीच संबंधात तणाव आला नाही. राज्याचे प्रमुख म्हणून मी नेहमीच त्यांचा आदर केलाय, असा अनुभवही अजित पवार यांनी म्हटलं.
तो पहाटे नाही, तर सकाळचा शपथविधी
राजकारणात कायमचं कोणीही कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो. मी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं, कदाचित त्यामुळे अनेकजण माझ्याबाबतीत तसं मत मांडत असतील. मात्र, हे राजकारण आहे. शिवाय आम्ही शपथ घेतली ती पहाटे नसून सकाळी घेतली होती. कारण, सकाळी ८ वाजता आमचा शपथविधी झाला होता. मी ४ वाजता, ५ वाजताच्या वेळेला पहाट म्हणतो, असेही अजित पवारांनी स्पष्ट सांगितले. तसेच, आता त्या शपथविधीवर मी काहीही बोलणार नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर, पुन्हा असं घडेल का? असा प्रश्न एबीपी माझाच्या पत्रकाराने विचारला होता, त्यावरही अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
राजकारणात कधी काय होईल, सांगता येत नाही
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. बिहारचं उदाहरण घ्यायचं झाल्यास नितीशकुमार हे भाजपला सोडतील असं कोणाला वाटलं होतं. पण, त्यांनी भाजपला सोडलं. विशेष म्हणजे नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव एकत्र येतील, असंही कोणाला वाटलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील, असे कोणाला वाटले होते का?. त्यामुळे, राजकारणात कधी काय होईल हे निश्चित नसतं, असे स्पष्टपणे अजित पवारांनी सांगितलं.