मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर भाजपा नेत्यांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री यांना लक्ष्य केलं जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देर आए दुरुस्त आए... असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर, भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचं जुनं ट्विट शेअर करत प्रश्न केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. मुंबईतील नागरिकांना 500 चौफूटपर्यंतच्या मालमतेसाठ करमाफीच्या घोषणेवरुन आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तर 2017 ची घोषणा असून निवडणुकीच्या तोंडावर आता पूर्ण करत असल्याचं म्हटलं. तर, केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरेंचं जुनं ट्विट शेअर करत, तुम्ही खरे बोलताय की उद्धव ठाकरे? असा प्रतिप्रश्नही केला आहे.
उपाध्ये यांनी भाजपा-शिवसेना सत्तेत असताना आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट शेअर केलं आहे. 8 मार्च 2019 म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे टविट असून त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची वचनपूर्ती.. असे म्हणत 500 फूटापर्यंतच्या करमाफीसंबंधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. त्यावरुन, नेमके खरे कोणय़? तुम्ही की उद्धव ठाकरे? कारण दोन वर्षांपूर्वीच तुम्ही आभार मानले होते, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
किशोरी पेडणेकरांचा पलटवार
भाजप नेत्यांची ही पोटदुखी आहे, मुंबईकरांना इतकं चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आधी त्यांना वाटायचं हे होणारच नाही, पण आता ते शक्य झालंय म्हणून कुठे ना ना कुठे भांडणं लावायची आणि मुंबईकरांना गुमहान करायचं काम, आशिष शेलारांनी सुपारी उचललेली आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केलाय.