Join us

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 12:04 PM

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे.

देशातील सैन्य दलात अग्निपथ सैन्य भरती योजनेला सुरुवातीपासूनच काँग्रेससह अनेकांचा विरोध होता. या भरतीप्रक्रियेला युवकांनीही विरोध दर्शवला होता. त्यानंतर, सरकारने अग्निवीर भरती सुरू केली, यातून देशातील अनेक राज्यातून युवकांची सैन्य दलात भरतीही झाली. मात्र, आता सीमारेषवर तैनात झालेल्या या युवकांच्या निधनानंतर पुन्हा एकदा अग्निवीर भरतीचा मुद्दा समोर येत आहे. अग्निवीर जवानांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळत असलेला लाभ, आणि सैन्यदलातील सेवेचा मिळत नसलेला शहीद हा दर्जा यावरुन ही भरतीप्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या भरतीवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. वीरमरण आलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना ना पेन्शन मिळते, ना अन्य कोणताही लाभ, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी करत अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवतेचा फोटोही शेअर केला. त्यानंतर, आता जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

आत्तापर्यंत सीमारेषेवर ४ अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांना जो सन्मान मिळायला हवा, तो मिळाला नाही. त्यांच्या गरीब आई-वडिलांना काय मिळणार आहे हेही अद्याप निश्चित नाही. म्हणजे, देशातील युवकांना सीमारेषेवर उभा करुन, त्यांच्यासोबत मृत्यूचा खेळ खेळवण्यासाठीच त्यांचा जन्म झालाय का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच, त्यांना कमीत कमी शहीदचा दर्जा तरी मिळायलाच पाहिजे, तोही त्यांना दिला जात नाही. तुम्ही कोणत्या सैन्य परंपरेचं पालन करत आहात. देशातील युवकांसोबत हा वाईट खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे, असेही आव्हाडा यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपानंतर लष्कराने वीरमरण आलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांस मिळणाऱ्या आर्थिक लाभासंदर्भात माहिती दिली आहे. लष्कराने म्हटले की, सोशल मीडियावर अनेक चुकीचे संदेश टाकले जात आहेत. शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत दिली जाते.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सियाचीन येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यावर असताना वीरमरण आलेले ते महाराष्ट्रातील पहिलेच अग्निवीर होत.

कुटुंबीयांना मिळणारी मदत

- विम्याची रक्कम : ४८ लाख रुपये- अग्निवीरद्वारे जमा केलेला सेवा निधी (पगाराच्या ३० टक्के) यात सरकार समान (व्याजासह) योगदान देईल.- सानुग्रह अनुदान रक्कम : ४४ लाख- मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे सेवा होईपर्यंत पूर्ण वेतन - सशस्त्र सेना बॅटल कॅज्युअल्टी फंडातून : ८ लाख- आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनकडून तत्काळ मदत : ३० हजार रुपये 

टॅग्स :अग्निपथ योजनाभारतीय जवानराहुल गांधीजितेंद्र आव्हाड