Join us

आरे तलावात विसर्जन करण्यास आरेसीईओ यांची मनाई! गणेश भक्तांमध्ये नाराजी

By मनोहर कुंभेजकर | Published: August 17, 2023 7:03 PM

पालिका प्रशासनाने आरे परिसराच्या बाहेर गणेश विसर्जनाची व्यवस्था करावी- आरे प्रशासन

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: येत्या दि,१९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे. गोरेगाव (पूर्व) येथील पुरातन आरे तलावात विसर्जनाची सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे.येथे जोगेश्वरी,गोरेगाव व मालाड परिसरातील दीड दिवस, पाच दिवस,गौरी गणपती,सात दिवस व अनंत चतुर्थीला घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सुमारे १००० हून अधिक गणेश मूर्तीचे विसर्जन होते.आणि दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. मध्य रात्री उशिरा पर्यंत येथे गणेश विसर्जन सोहळा सुरू असतो.

आरेच्या नैसर्गिक तलावात २०१६ पर्यंत येथे सुरळीत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन होत होते.मात्र पर्यावरण जलवायू व हवामान बदल विभाग ,भारत सरकार,नवी दिल्लीयांच्या ५ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचने नुसार आरे दुग्ध वसाहती मधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील ( इएसझेड) म्हणून घोषित करण्यात आल्याने यंदा आरे तलावात गणेश विसर्जन करता येणार नाही असे पत्र आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी दि,११ ऑगस्ट रोजी पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांना पाठवले आहे.

सदर पत्रामुळे मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कुठलाही पर्याय न देता या घेतलेल्या प्रशासनाच्या  निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. विनोद घोसाळकर यांनी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. याबाबत विचार विनिमय करण्यासाठी मुंबई उपनगर श्री गणेशोत्सव समन्वय समिती व उबाटा गटाचे स्थानिक आमदार रवींद्र वायकर व आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांच्या सोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी घोसाळकर यांनी सदर पत्राद्वारे केली आहे.

आरे प्रशासनाची भूमिका

याबाबत लोकमतने आरेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,आरेत पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.विधानसभेत आरे तलावातील साचलेला गाळ पालिकेंने काढायचा का आरे प्रशास्नानाने काढयचा यावर सुमारे अर्धा तास विधानसभेत चर्चा झाली होती.त्यानंतर याबाबत पशु व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या बरोबर आमच्या आढावा बैठकीत ५ डिसेंबर २०२२ च्या अधिसूचने नुसार आरे दुग्ध वसाहती मधील संपूर्ण परिसर पर्यावरण व संवेदनशील ( इएसझेड) म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच सदर अधिसूचने नुसार वनशक्ति या संस्थेने आरे तलावात मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले जात असल्याने प्रदूषण होते असे आरे प्रशासनाला कळवले आहे. आरेचा पर्यावरण समतोल राखणे गरजेचे आहे. हा मुद्दा आढावा बैठकीत  चर्चेला असला असता यंदा आरे तलावात घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही असे आदेश आरे प्रशासनाला सचिव तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही सदर पत्र पालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.पालिका प्रशासनाने आरे परिसराच्या बाहेर कृत्रिम तलाव उपलब्ध करून घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करावी असे त्यांना सूचित केले आहे.

टॅग्स :आरेगणेशोत्सव