एल्गार परिषद प्रकरण : उच्च न्यायालयाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत व कवी वरावरा राव यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना त्यांच्या वयाचा व प्रकृतीचा विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएला बुधवारी दिले.
तळोजा कारागृहात राव यांच्यावर व्यवस्थित वैद्यकीय उपचार करण्यात येत नसल्याचे सांगत राव यांच्या पत्नी हेमलता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राव यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले. नोव्हेंबरपासून आतापर्यंत राव नानावटीत उपचार घेत आहेत. नानावटी रुग्णालय राव यांच्या प्रकृतीसंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करत आहे. रुग्णालयाचे बिल भरण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली आहे.
* जामीन अर्जावर आज सुनावणी
राव (८१) यांचे वय व प्रकृतीचा विचार करून युक्तिवाद करा. आपण सर्व मानव आहोत, असे न्या. एस.एस. शिंदे यांनी बुधवारच्या सुनावणीत म्हटले. तसेच राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने गुरुवारी ठेवली.
.......................................