मीरा-भाईंदरमध्ये पार्किंगवरून होते वाहतूक पोलिसांशी वादावादी; नव्या पार्किंग लॉट्सची प्रतीक्षा
By धीरज परब | Published: January 11, 2024 06:46 AM2024-01-11T06:46:13+5:302024-01-11T06:46:30+5:30
शहरात केवळ तीनच वाहनतळ उपलब्ध
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मीरा-भाईंदर शहरात वाहनांच्या तुलनेत पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यातून वाहतूककोंडी तसेच बेकायदा पार्किंगवरील कारवाई आणि पार्किंगवरून होणारे वादही चिंतेचा विषय बनले आहेत. महापालिकेने शहरात सध्या केवळ तीन ठिकाणी पे ॲण्ड पार्कची सुविधा दिली असली तरी येत्या काही दिवसांत शहरात आणखी १५ पे ॲण्ड पार्क नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार आहेत.
मीरा-भाईंदर शहर हे मुंबईला खेटून असल्याने येथील बांधकाम व्यवसाय व लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या अनुषंगाने १९९५ सालच्या विकास आराखड्यातील रस्ते हे आता अतिशय अरुंद पडू लागले आहेत. त्यातच ज्या ज्या ठिकाणी शाळा, रुग्णालये, दुकाने, वाणिज्य वापराच्या आस्थापना वा सार्वजनिक आस्थापना आहेत, त्या ठिकाणी आवश्यक पार्किंगची सुविधाच उपलब्ध नाही. परिणामी, नागरिकांना नो पार्किंगमध्ये वा जिकडे जागा मिळेल तिकडे वाहने उभी करावी लागतात. नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली, म्हणून वाहतूक पोलिस कारवाई करायला येतात. तेव्हा का कारवाई केली, म्हणून लोक त्यांच्याशी हुज्जत घालतात. वाहने उभी करण्यावरूनही रहिवासी वा दुकानदार यांच्यासोबत हुज्जत, वाद होतात. काशिमीरा नाका ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून, त्या ठिकाणीही पार्किंगची सुविधा नाही.
पार्किंगची समस्या गंभीर
- महापालिका, तत्कालीन नगरसेवक, राजकारणी आदींची उदासीनता वा अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहरातील पार्किंग समस्या गंभीर बनत चालली आहे. महापालिकेने सध्या भाईंदर पश्चिम भागात एकमेव स्कायवॉक येथे १०६ दुचाकीचे पे ॲण्ड पार्क दिले आहेत.
- भाईंदर पूर्व भागात पार्किंगची सोयच नाही. मीरा रोडच्या कनकिया येथील स्टार मार्केटमागे वाहनतळ आरक्षण आहे. त्या इमारतीत ६६ चारचाकी वाहन पार्किंगची क्षमता आहे, तर मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या वाहनतळ आरक्षणात एक हजार ३४६ दुचाकी वाहनांचे पे ॲण्ड पार्क वाहनतळ आहेत.
नवीन १५ वाहनतळ निश्चित
- सध्याची वाहनतळ सुविधा अगदी नाममात्र असून, महापालिकेने शहरात नवीन १५ वाहनतळ निश्चित केले आहेत.
- त्या ठिकाणच्या निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या असून, येत्या काही दिवसांत ही वाहनतळ नागरिकांसाठी पे ॲण्ड पार्क तत्त्वावर दिली जातील.
- या १५ वाहनतळांमध्ये दाेन हजार ८८३ चारचाकी तर पाच हजार ९४३ दुचाकी वाहने उभी राहण्याची क्षमता आहे.
- याशिवाय पालिकेने शहरात आणखी ३४ नवीन वाहनतळ प्रस्तावित केली असून, त्याला वाहतूक पोलिस, बांधकाम विभाग आदींकडून हिरवा सिग्नल आल्यानंतर ती सुरू केली जाणार आहेत.