एनसीबीला हवा असलेला ‘अर्जुन’ म्हणजे रामपाल नव्हे; अधिकाऱ्यांना असलेला संशय झाला दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:18 AM2020-12-27T01:18:15+5:302020-12-27T07:02:08+5:30

एनसीबीने अर्जुन रामपालची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमेट्रीडेस हिचा भाऊ अंजिलोस याला अटक केल्यानंतर त्याचे मोबाइलचे व्हाॅट्सॲप चॅट तपासले.

The 'Arjun' that the NCB wants is not Rampal | एनसीबीला हवा असलेला ‘अर्जुन’ म्हणजे रामपाल नव्हे; अधिकाऱ्यांना असलेला संशय झाला दूर

एनसीबीला हवा असलेला ‘अर्जुन’ म्हणजे रामपाल नव्हे; अधिकाऱ्यांना असलेला संशय झाला दूर

Next

मुंबई : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनच्या संशयावरून अडचणीत आलेल्या अभिनेता अर्जुन रामपालबद्दल अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांचा एक संशय दूर झाला आहे. त्यांना हवा असलेला ‘अर्जुन’ हा तो नसल्याची त्यांची खात्री पटली आहे. मात्र त्याला अद्याप पूर्णपणे क्लीन चिट दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची दोन टप्प्यांत जवळपास १३ तास चौकशी करण्यात आली.

एनसीबीने अर्जुन रामपालची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डिमेट्रीडेस हिचा भाऊ अंजिलोस याला अटक केल्यानंतर त्याचे मोबाइलचे व्हाॅट्सॲप चॅट तपासले. त्यात अर्जुन नावाचा उल्लेख अनेकदा आला आहे. तो व्यक्ती अर्जुन रामपाल असावा, असा अधिकाऱ्यांना संशय होता. रामपालकडे विचारणा केली असता तो अर्जुन आपण नसल्याचे रामपालने सांगितले. अंजिलोसकडे चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती अन्य असल्याचे स्पष्ट झाले.

एनसीबीकडून अद्याप क्लीन चिट नाही

अन्य बाबतीत अर्जुन रामपाल अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे.  १२ नोव्हेंबरला त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांना बंदी असलेल्या ट्रमाडॉल व क्लोनजेपाम या दोन गोळ्यांची पाकिटे सापडली होती. त्यापैकी एक त्याने आपल्या पाळीव कुत्र्यासाठी घेतल्याचे सांगितले. 

वांद्रे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने जूनमध्ये दिलेले प्रिस्किप्शन सादर केले, तर दुसऱ्या वेदनाशामक गोळ्या दिल्लीतील मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याने घेत असल्याचे सांगितले. मात्र त्याने अधिकाऱ्यांना दिलेले प्रिस्किप्शन जुन्या तारखेचे असल्याने अद्याप त्याला क्लीन चिट मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The 'Arjun' that the NCB wants is not Rampal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.