एनसीबीच्या चौकशीसाठी अर्जुन रामपाल गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:31+5:302020-12-17T04:34:31+5:30
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : मागितली २१ डिसेंबरपर्यंत मुदत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल बुधवारी अमली ...
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : मागितली २१ डिसेंबरपर्यंत मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल बुधवारी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) चौकशीला गैरहजर राहिला. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मुंबई बाहेर असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचे त्याने कळविले, तसेच २१ डिसेंबरला कार्यालयात हजर राहण्याची तयारी दर्शविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडचे ड्रग्ज संबंध चव्हाट्यावर आले आहेत. अर्जुन रामपालही एनसीबीच्या रडारवर आहे. दीड महिन्यांपूर्वी त्याच्या वांद्रे येथील घरावर त्यांनी छापा टाकून मोबाइल, लॅपटॉप, टॅब जप्त केले होते. त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रीएड्सची सलग दोन दिवस तर रामपालची एक वेळ स्वतंत्रपणे कसून चाैकशीही केली. त्याच्या चालकालाही ताब्यात घेऊन विचारणा करण्यात आली होती. ग्रॅबिएलाचा भाऊ अंजिलीयसला ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती.
अर्जुन रामपालच्या चौकशीत त्याने काही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत असल्याची कबुली दिली होती. त्याच्याविरुद्ध आणखी काही माहिती हाती लागल्याने त्याला चौकशीसाठी समन्स जारी केले होते. मात्र, बुधवारी तो एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मुंबईबाहेर असल्याचे कारण त्याने दिले.
......................