Join us

अर्जुन रामपालची पुन्हा सहा तास कसून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:07 AM

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविलालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता अर्जुन रामपालची नार्कोटिक्स ...

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : दिल्लीतील डॉक्टरांचा जबाब नोंदविला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपालची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सोमवारी दुसऱ्यांदा सहा तास कसून चौकशी केली. त्याला बंदी असलेले उत्तेजक औषध लिहून दिलेल्या दिल्लीतील संबंधित डॉक्टरांचा जबाब नोंदवून घेतला.

बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने रामपाल व त्याची दक्षिण आफ्रिकन गर्लफ्रेंड गॅब्रिएला एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यांना आवश्यकतेनुसार पुन्हा चाैकशीसाठी बाेलावण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

गेल्या १३ नोव्हेंबरला रामपालची एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली होती. त्यापूर्वी चार दिवस आधी त्याच्या वांद्रे येथील घरात छापा टाकला. त्या वेळी लॅपटॉप, फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाेबत बंदी असलेल्या वेदनाशामक (पेन किलर) क्लोनाजेपॅम गोळ्या जप्त केल्या होत्या. मागील चौकशीत त्याने त्याबाबत दिल्लीतील डॉ. रोहित गर्ग यांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक चौकशीसाठी त्याला १६ डिसेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते. मात्र वैयक्तिक कामानिमित्त लंडनला असल्याचे सांगत ताे गैरहजर राहिला.

त्यानंतर रविवारी मुंबईत परतल्यानंतर ठरल्यानुसार साेमवारी त्याने एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्याची सुमारे सहा तास चौकशी केल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास तो कार्यालयातून बाहेर पडला. त्याला औषध लिहून दिलेल्या डॉ. गर्ग यांचाही सीआरपीसी कलम १४४ अन्वये जबाब नोंदवून घेण्यात आला. रामपालने एका कौटुंबिक मित्राद्वारे आपल्याशी संपर्क साधला होता. त्याला आवश्यकता असल्याने पेनकिलर लिहून दिल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणी रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाची दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली असून तिचा भाऊ तसेच रामपालचा ऑस्ट्रेलियन मित्र पॉल बार्टलला ड्रग्ज तस्करीबद्दल अटक करण्यात आली.

...........................................