बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबी पुन्हा चौकशीला बोलावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) रडारवर असलेल्या अभिनेता अर्जुन रामपाल याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तो ड्रग्जचे सेवन करीत असल्याचा संशय बळावला असल्याने त्याला लवकरच चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येणार आहे, असे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले.
गेले दोन दिवस एनसीबीने अर्जुन रामपाल याची बहीण कोमल हिच्याकडे कसून चौकशी केली आहे. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन हा ड्रग्ज घेत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावून ताब्यात घेतले जाऊ शकते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडचे ड्रग्ज रॅकेट चव्हाट्यावर आले. त्यातून आतापर्यंत एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक याच्यासह ३५ हून अधिक तस्करांना अटक केली आहे. तर याच प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अर्जुन रामपालच्या वांद्रे येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. त्या वेळी त्याच्याकडे प्रतिबंधित औषधे सापडली होती. त्या औषधांचे प्रीस्क्रिप्शन त्याने एनसीबी अधिकाऱ्यांना दाखवले. मात्र, ते जुने असल्याचे एनसीबीच्या तपासात पुढे आले. त्यामुळेच अर्जुनची २१ डिसेंबरला पुन्हा चौकशी झाली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आता कोमलचीही चौकशी झाली आहे.