Join us

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : अरमान खत्रीची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 8:49 AM

जामिनासाठी त्याला २५ हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयआयटी, मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोळंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला त्याचा वर्गमित्र अरमान खत्री याला विशेष न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. जामिनासाठी त्याला २५ हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मूळचा अहमदाबादच असलेला आणि बी.टेक (केमिकल) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या दर्शनने १२ फेब्रुवारी रोजी पवई येथील आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सोळंकीच्या खोलीतून सुसाइड नोट सापडली. त्यात अरमानने मला मारले, असे लिहिले होते. त्यानंतर, ९ एप्रिलला एसआयटीने खत्रीला अटक केली. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीचे म्हणणे...

या प्रकरणात आपल्याला लक्ष्य करण्यात आले असून, आपल्यावर नाहक गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे खत्रीने जामीन अर्जात म्हटले आहे. सोळंकीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे थेट पुरावे पोलिसांकडे उपलब्ध नाहीत, तसेच सोळंकीच्या पालकांनी थेट आपल्याविरोधात आरोप केलेला नाही, असे जामीन अर्जात म्हटले आहे. खत्रीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या प्रकरणाचा त्याच्या भविष्यावर परिणाम होईल, असा युक्तिवाद खत्रीच्या वकिलांनी न्यायालयात केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खत्रीची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :न्यायालयमुंबई