मुंबई : बड्या कंपनीत मॅनेजर आणि नामांकित शाळेच्या विश्वस्त असलेल्या ४६ वर्षीय महिलेच्या घरात घुसलेल्या लुटारूंनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावार तब्बल साडेचौदा लाखांचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी घडली. ही महिला वृद्ध आईसोबत राहाते. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पवईच्या साकीविहार रोडवरील उच्चभ्रू वसाहतीमध्ये शुभांगी नरसुळे (४६) या त्यांची आई करुणाबाई (७५) यांच्यासोबत राहतात. त्या येथील एका बड्या खासगी कंपनीत मॅनेजर असून, येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विश्वस्त आहेत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला जाण्यासाठी शुभांगी तयारी करत होत्या. रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांच्या दरवाजावरील बेल वाजली. करुणाबाई यांनी दरवाजा उघडताच, तोंडावर रुमाल बांधलेले दोन तरुण घरात घुसले. यातील एकाने त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हर शुभांगी यांच्या डोक्याला लावले. शुभांगी आणि करुणाबाई घाबरून ओरडू लागल्या असता, दोन्ही तरुणांनी हाताने तोंड दाबून त्यांना बेडरूममध्ये नेले.घडलेल्या प्रकारने दोघीही चांगल्याच घाबरल्या होत्या. दोघींचाही प्रतिकार संपल्याचेलक्षात येताच, लुटारूंनी दोघींच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि कपाटातील १३ लाखांची रोख रक्कम बॅगेत भरली. तेथून पळ काढण्यापूर्वी या लुटारूंनी शुभांगी यांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखून, ‘अगर पोलीस में खबर दी, तो तुम्हें और असीम (कंपनीचे मालक) को मार डालुंगा,’ असे धमकावले. जाताना त्याने शुभांगी यांच्या चार सोन्याच्या बांगड्या काढण्यास सुरुवात केली. मात्र, प्रसंगावधान दाखवत या बांगड्या सोन्याच्या नाहीत, असे शुभांगी यांनी सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत काढलेली एक बांगडी घेऊन लुटारूंनी तेथून पळ काढला. घाबरलेल्या दोघींनी एकमेकांना धीर देत, शुभांगी यांनी याची माहिती कंपनीच्या मालकांना दिली. त्यानंतर, पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.>तपास सुरूमहिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच अन्य सर्व बाजूंनी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.
नामांकित शाळेच्या महिला विश्वस्ताच्या घरात सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:52 AM