सशस्त्र तरुण सहज शिरला चित्रनगरीत
By admin | Published: May 23, 2015 01:41 AM2015-05-23T01:41:20+5:302015-05-23T01:41:20+5:30
दर दिवशी गोरेगावच्या चित्रनगरीत या ना त्या चित्रपटाचे किंवा मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. त्यासाठी अनेक छोट्या-बड्या अभिनेत्यांचा या नगरीत राबता असतो.
मुंबई : दर दिवशी गोरेगावच्या चित्रनगरीत या ना त्या चित्रपटाचे किंवा मालिकांचे चित्रीकरण सुरू असते. त्यासाठी अनेक छोट्या-बड्या अभिनेत्यांचा या नगरीत राबता असतो. असे असताना या नगरीच्या सुरक्षेचा प्रश्न शिवसेना पदाधिकारी श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर झालेल्या गोळीबाराने ऐरणीवर आला आहे. त्यांचा हल्लेखोर डोक्यावर हेल्मेट घालून, हाती शस्त्र घेऊन सहज चित्रनगरी शिरला, गोळ््या झाडून त्याच सहजतेने तो बाहेरही पडला, अशी धक्कादायक माहिती या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना मिळाली आहे.
शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चित्रनगरीतल्या कालिया मैदानात, बालाजी प्रॉडक्शनच्या सेटबाहेर शिंदे त्यांचे भागीदार संदीप भोसले यांच्यासोबत बसले होते. तेव्हा त्यांच्याजवळ एक हेल्मेट घातलेला तरुण आला. काही कळायच्या आत या तरुणाने कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढून शिंदेंच्या दिशेने तीन गोळ््या झाडल्या. गोळ््या झाडून हा तरुण धावत गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडला. तेथे आधीपासूनच त्याचा साथीदार पल्सर बाईकसोबत होता. हल्लेखोर येताच त्याने बाईक सुरू केली. दोघांनीही धूम ठोकली. शिंदेंवरील गोळीबार सोबत असलेल्या भोसले आणि त्यावेळी तेथे उपस्थित अनेकांनी पाहिला. त्यांनी आरडाओरडा करताच एका सुरक्षारक्षकाने बाईकचा पाठलाग केला. मात्र दोनशे मीटर अंतरावर त्याला हल्लेखोरांनी मागे सोडलेली बाईक सापडली. तो तेथे पोहोचेपर्यंत हल्लेखोर जंगलातल्या आडवाटेने पसार झाले होते.
अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष हल्लेखोर आणि त्याचा साथीदार दोघांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे गोळीबार अनेकांनी पाहिला असला तरी त्यांचे चेहेरे स्पष्टपणे दिसलेले नाहीत. ते पुढे म्हणाले, प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक सतर्क असते, त्यांनी या तरुणाला थोडेतरी हटकले असते तर कदाचित हा गुन्हा टळू शकला असता.
पुंगळ््या, गोळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत
हल्लेखोराने झाडलेल्या तीन गोळ््यांपैकी एक पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच गोळ््यांच्या रिकाम्या पुंगळ्याही पोलिसांना सापडल्या आहेत. त्या पुढील चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत धाडल्या आहेत. त्यावरून हल्लेखोरांनी वापरलेल्या शस्त्राचा अंदाज पोलिसांना येऊ शकेल.
तपासासाठी पाच विशेष पथके; प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाब नोंद
या घटनेचे प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून पोलिसांनी संदीप भोसले यांचा जबाब नोंदवला आहे. शिंदे यांची ट्रिनिटी नावाची खासगी सुरक्षारक्षक एजन्सी आहे. चित्रनगरीतही ट्रिनिटीचे सुरक्षारक्षक आहेत. या कंपनीत भोसले भागीदार असल्याचे समजते. या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. चित्रनगरीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी कैद केलेले क्षण तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक पथक या चित्रणाचा अभ्यास करत आहे. या गुन्ह्याची उकल करण्याच्या दृष्टीने योजनाबद्ध तपास सुरू असल्याचे अप्पर आयुक्त पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हल्लेखोरांनी मागे सोडलेली बाईक ताब्यात घेतली असून तिचा मालक कोण, याचाही शोध सुरू असल्याचे समजते. बाईक कोळी नावाच्या व्यक्ती असून काही दिवसांपूर्वी ती त्याने विकली होती. मात्र त्याची कागदपत्रे ट्रान्स्फर केली नाहीत. हल्लेखोर हे अमिताभ बच्चन यांच्या सेटजवळून पळाले. पोलिसांनी एकाला संशयावरून ताब्यात घेतल आहे. त्याची चौकशी पोलीस करत आहेत.