महेश चेमटेमुंबई : लष्करामार्फत आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, रविवारी करी रोड येथेही लष्कराने यशस्वीपणे पूल उभारला. या तिन्ही ठिकाणी काम करत असताना, सर्वसामान्य मुंबईकरांच्या आणि प्रवाशांनी त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया वेळोवेळी व्यक्त केल्या. या वेळी प्रवाशांच्या चेहºयावर एक समाधान दिसून आले. हे समाधान म्हणजे आम्ही आमच्या कामाचा गौरव समजतो. लष्कर सीमेवर खडा पहारा देते, आज प्रत्यक्ष लोकांसाठी काम केल्याचा अभिमान लष्कराला आहे, असे गौरवोद्गार बॉम्बे सॅपर्सचे कंमाडंट बिग्रेडिअर धीरज मोहन यांनी काढले.करी रोड येथे लष्करी पादचारी पुलाच्या यशस्वी उभारणीनंतर ब्रिगेडिअर धीरज मोहन यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले, आंबिवली, एल्फिन्स्टन-परळ या तिन्ही भागांत लष्कराने बेली पद्धतीचा पूल उभारला. करी रोड येथील पूल उभारणीचे जिकिरीचे काम वेळेत पूर्ण झाले. हे काम करणाºया सर्व जवानांचे विशेष कौतुक करतो. त्याचबरोबर, संबंधित सर्व यंत्रणेसह मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांनाही धन्यवाद देतो.११ टप्प्यांमध्ये करी रोड येथील पूल उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. करी रोड येथील मोठ्या प्रमाणातील लोकल-एक्स्प्रेस यांची वाहतूक, मर्यादित जागा आणि वेळ, पुलाच्या बांधकामांचे साहित्य आणि मशिनरी यांची व्यवस्था अशी विविध आव्हाने या ठिकाणी होती. मात्र, लष्कराने सुनियोजन, पूर्वतयारी यांच्या मदतीने आव्हाने पार केली. यासाठी लष्कराने आधुनिक पद्धतीने पुलाची बांधणी केली. तिन्ही ठिकाणी ३५० टन वजनी क्षमता असलेल्या क्रेनचा वापर करण्यात आला, अशी माहिती धीरज मोहन यांनी दिली.सध्या पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ पायºया आणि छताचे काम बाकी आहे. १० ते १५ दिवसांत करी रोड लष्करी पादचारी पुलाच्या पायºयांचे आणि छताचे काम पूर्ण करण्यात येईल. यापूर्वीदेखील लष्कराने जवानांसाठी अशा पद्धतीचे अनेक पूल उभारले आहेत. मात्र, प्रवाशांसह मुंबईकरांसाठी काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईकरांनी लष्कराला भरभरून प्रेम दिले, याबद्दल लष्कराकडून मुंबईकरांचे विशेष आभार व्यक्त करतो, असे भावुक उद्गारही धीरज मोहन यांनी काढले.>जल्लोष आणि मिठाईवाटपएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईत लष्करी पादचारी पूल उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, १८ जानेवारी रोजी आंबिवली येथील पादचारी पूल उभारला. २७ ते २८ जानेवारी या काळात एल्फिन्स्टन-परळ पादचारी पूल उभारला, तर शेवटचा पादचारी पूल ४ फेब्रुवारी रोजी उभारण्यात आला. रविवारी पूल उभारणीचे काम यशस्वी झाल्यानंतर, स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. त्याचबरोबर, जवानांमध्ये मिठाईचे वाटप केले. या पुलाचे काम पाहण्यासाठी विविध विभागांचे रेल्वे अधिकारी करी रोड येथे उपस्थित होते.>ब्लॉक काळात मध्य रेल्वेने परळ येथील १२ मीटरच्या पादचारी पुलाच्या गर्डरचीदेखील उभारणी केली. या वेळी मध्य रेल्वेने ३०० टन वजनी क्रेन, २५ टन वजनी क्षमता असलेल्या ४ क्रेन, २ जेसीबींच्या मदतीने प्रत्येकी १८ टन वजनाचे ९ गर्डर उभारले.
लष्कराने करी रोडचा पूलही उभारला, अकरा टप्प्यांमध्ये काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 4:21 AM