मुंबई : शिवसेनेचे भांडुप येथील आमदार अशोक पाटील यांना आईवरून अत्यंत अश्लाघ्य शिव्या देऊन धमक्यांचे फोन येत असल्याची बाब आज त्यांनीच विधानसभेत मांडली. एका आमदारास अशा धमक्या येत असतील तर सामान्यांचे काय, असा सवालही त्यांनी केला.औचित्याच्या मुद्याद्वारे बोलताना अशोक पाटील म्हणाले की, मला अलिकडे एकाच दिवशी धमक्यांचे तीन कॉल्स आले. आपण त्याची तक्रार भांडुप पोलीस ठाण्यात केली पण त्याची काहीही दखल घेतली गेली नाही.‘मै अण्णा बोल रहा हू, मेरे से मुंबई मे कोई टक्कर नही लेता’ अशी धमकी देत समोरच्या व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिली. मी या विषयी पोलिसात तक्रार दिली, सोबत कॉल रेकॉर्डही दिला. हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे पण पोलीस त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत, असे अशोक पाटील म्हणाले.शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी, अशोक पाटील यांचे पोलीस संरक्षण वाढविण्याची व धमक्यांप्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली. त्यावर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले की मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालेन आणि सहपोलीस आयुक्त चौकशी करतील. अशोक पाटील यांना जादा पोलीस संरक्षण हे त्यांच्याशी चर्चा करून दिले जाईल.
सेना आमदारास धमक्यांचे कॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:20 AM