Join us

सेना-भाजपा युती तुटली?

By admin | Published: May 24, 2015 11:08 PM

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या मित्र पक्षांची युती होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.

ठाणे : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या मित्र पक्षांची युती होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत सेना-भाजपाची युती होईल असा निर्वाळा दिला होता. त्याला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला होता. या पार्श्वभूमीवर सेना-भाजपाच्या जिल्हास्तरीय नेत्यांची एक बैठकही वसईत झाली. परंतु, कोल्हापूर येथे भाजपाच्या प्रदेश अधिवेशनात भाषण करतांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी या पुढे भाजपा सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल युती, आघाडी कोणाशीही करणार नाही असे जाहीर केल्यामुळे वसई-विरार महापालिका निवडणुकीतील सेना-भाजपाची संभाव्य युती जवळ-जवळ संपुष्टात आली आहे. याबाबत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील नेते मौनी झाले आहेत. कारण युती होईल म्हणणारे प्रदेशाध्यक्ष तर होणार नाही म्हणणारे राष्ट्रीय अध्यक्ष अशा स्थितीत प्रतिक्रिया तरी काय द्यायची असा प्रश्न सगळ््यांना पडला आहे. त्यामुळे श्रेष्ठी सांगतील तसे करू असा मध्यममार्गी पवित्रा नेत्यांनी घेतला आहे.जर युती झाली नाही तर याचा सगळ््यात जास्ती फायदा होणार आहे तो बहुजन विकास आघाडीला. कारण तिच्या एकछत्री वर्चस्वाला या निवडणुकीत जे काही थोडे फार आव्हान दिले जाणार होते ते फक्त या युती कडूनच दिले जाणार होते. आता ते ही संपुष्टात आले तर तिला या निवडणुकीत बाय मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे. काँग्रेसने आपण स्वबळावर लढणार असे स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच वसईत तशी घोषणा केली. तर राष्ट्रवादीत अद्यापही सारी सामसूम आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आता काय घडते या कडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे. (विशेष प्रतिनिधी)