Join us  

सेना-भाजपातील संघर्ष पेटणार

By admin | Published: July 06, 2017 7:16 AM

सत्तेच्या शर्यतीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतरही पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारणाऱ्या भाजपाने प्रत्येक वळणावर मात्र शिवसेनेची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सत्तेच्या शर्यतीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतरही पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारणाऱ्या भाजपाने प्रत्येक वळणावर मात्र शिवसेनेची नाकाबंदीच सुरू केली आहे. मतदारांना दिलेले पारदर्शकतेचे वचन पाळण्यासाठी भाजपा नगरसेवक डोळ्यांत तेल ओतून पालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे एकहाती सत्ता मिळूनही शिवसेनेला आपला अजेंडा राबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. यातूनच वैधानिक समित्यांपासून महासभांच्या प्रत्येक बैठकीत वादळी चर्चा रंगू लागल्याने शिवसेना-भाजपात सत्ता संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. त्यात पालिकेतील शिवसेना-भाजपाच्या ताज्या झोंबाझोंबीमुळे संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. ‘मिशन १००’ घेऊन पालिका निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने स्वबळावर मोठा विजय मिळवला. मात्र राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी महापालिकेवर कमळ खुलवण्याचे भाजपाचे स्वप्न अपूर्णच राहिले. एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर विरोधी पक्षाच्या बाकांवर बसणे ही भाजपाची हारच ठरली असती. त्यामुळे पहारेकऱ्यांची भूमिका स्वत:हून उचलत भाजपाने दरारा कायम ठेवला. वैधानिक समित्यांमध्ये प्रस्ताव, प्रकल्पांना विरोध करीत शिवसेनेला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न पहारेकरी करीत आहेत.त्यांचा हा वचक तोंडाला फेस आणत असल्याने शिवसेनेच्या गोटातही तीव्र अस्वस्थता आहे. यातूनच कधी टिष्ट्वटरयुद्ध तर कधी सभागृहात घोषणायुद्ध, शाब्दिक चकमकी उडत आहेत. आपला महापौर आणण्याचे स्वप्न भंगल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीवेळी सतत घोषणाबाजी करत ‘महापौर तुमचा तरी आवाज आमचा’ असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून मोठे प्रस्ताव, प्रकल्पांवेळी भाजपाचे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. एकेकाळी गळ्यात गळे घालणाऱ्या सेना-भाजपात विस्तवही जात नसल्याचे दिसत आहे. भाजपाच्या प्रस्तावांना सुरुंग भांडुप येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याची भाजपा नगरसेवकांची मागणी आहे. मात्र रुग्णालयासाठी आरक्षित असलेली जागा विकासकाला परत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तब्बल आठ हजार चौरस मीटर जागेवर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. हा प्रस्ताव फेटाळण्याची भाजपाची मागणी होती. शिवसेनेने मात्र भाजपाला उपसूचना मांडण्याची संधी न देताच या प्रस्तावावरील चर्चा लांबणीवर टाकली. कर ‘वाढवून दाखविले’ : महापालिकेने २०१२ पासून पाण्यावर दरवर्षी आठ टक्के वाढीव कर लावला आहे. या करवाढीचा कालावधी २०१७मध्ये संपला. ही करवाढ सुरू ठेवण्यात येणार आहे. याचा समाचार घेताना ज्यांनी आपल्या वचननाम्यात करवाढ करणार नाही असे म्हटले त्यांनी करवाढ करून दाखवल्याचा टोला भाजपाने लगावला. राणीबागेच्या शुल्कवाढीचा वादभायखळा येथील राणीबागेत पेंग्विनच्या रूपाने नवीन पाहुणे आल्याने पर्यटक वाढले आहेत. त्यामुळे राणीबागेच्या शुल्कात वाढ होणार आहे. या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला असून, शिवसेनेने मात्र शुल्कवाढीचे समर्थन केले आहे. मेट्रोच्या मार्गात खो : मेट्रो रेल्वे हा भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर साकारण्याचे आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र आरे कॉलनीतील जागा मेट्रो प्रकल्प ३च्या कारशेडसाठी सोडण्यास शिवसेना तयार नाही. ‘किस्सा खुर्सी का’ : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांसाठी सागवान लाकडाच्या २,४३८ टेबल-खुर्च्या खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सागवान लाकडाच्या खुर्च्या व टेबल घेण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना भाजपाने मांडली. त्यामुळे शिवसेनेला हा प्रस्ताव मतास टाकावा लागला. या मतदानात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या विरोधी पक्षांनी भाजपाच्या उपसूचनेला समर्थन दिले.