Join us

सेना-काँग्रेसकडून दमदार उमेदवारांचा शोध

By admin | Published: October 24, 2016 3:25 AM

शिवसेना आणि काँग्रेसकडून मुंबई उपनगरातील के वेस्ट वॉर्डमध्ये दमदार उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. के वेस्ट वॉर्डला नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे.

मुंबई : शिवसेना आणि काँग्रेसकडून मुंबई उपनगरातील के वेस्ट वॉर्डमध्ये दमदार उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. के वेस्ट वॉर्डला नव्या प्रभाग रचनेचा फटका बसला आहे. गेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसने याच वॉर्डमध्ये आघाडी घेतल्याने शिवसेनेला यंदा आपले वर्चस्व राखावे लागेल. त्यासाठी भाजपाची साथ महत्त्वाची ठरेल. २0१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत के वेस्ट वॉर्डमध्ये काँग्रेसचे ५, शिवसेनेचे ४, भाजपाचे २, मनसेचा १ आणि अपक्ष १ निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. हे पाहता यंदा पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी शिवसेनेला मोठे नियोजन करावे लागेल. या वेळी शिवसेना आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्यात येत आहे. मात्र या वॉर्डमध्ये वर्चस्व राखायचे असेल तर ही भूमिका बाजूला ठेवून त्यांना एकत्र काम करावे लागेल. यंदा के वेस्ट वॉर्डमध्ये वर्सोवा साईनगर, वर्सोवा जेट्टी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मेट्रो डेपो, आर.टी.ओ., लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट, म्हाडा कॉलनी, आनंद नगर, रायगड मिलिटरी स्कूल, मोमिन नगर, बेहराम बाग, ओशिवरा, शुक्ला इस्टेट, वीरा देसाई इंडस्ट्रिअल इस्टेट, जीवननगर, म्हाडा कॉलनी, सहकारनगर, पटेल इस्टेट, शिवालिकनगर, पाटीलवाडी, खान इस्टेट, अंबोली, रामबाग, धाकोजी शेठपाडा, दत्तगुरूनगर, गिल्बर्ट हिल, धनगरवाडी, लोहाना कॉलनी, गावदेवी डोंगरी, गुलमोहोर कॉलनी, म्हाडा कॉलनी, चार बंगला, भवन्स कॉलेज, मोरा गाव, भारतनगर, सात बंगला, जुहू तारा, विठ्ठलनगर, वल्लभनगर, नेहरूनगर, इर्ला, आझादनगर, प्रेमनगर मिठीबाई कॉलेज, जुहू एअरपोर्ट, दौलतनगर, जुहू कोळीवाडा, इंदिरानगर या भागांचा समावेश आहे. वॉर्ड पुनर्रचनेबाबत ६७४ हरकतीमहापालिका निवडणुकीसाठी नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या वॉर्ड आणि प्रभागांसाठी एकूण ६७४ सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील तब्बल ३०० हरकती या एकट्या एल वॉर्डमध्ये करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने ३ आॅक्टोबर रोजी वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर केले होते. नवीन वॉर्डरचना आणि आरक्षणासंदर्भात २० आॅक्टोबरपर्यंत सूचना व हरकती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत ६७४ सूचना, हरकती दाखल झाल्या आहेत. यातील निम्म्या तक्रारी एकट्या एल वॉर्डच्या आहेत. कुर्ला, चांदिवली, पवई, साकीनाका परिसराचा या वॉर्डात समावेश आहे. वॉर्डाची सीमा आणि आरक्षणाबाबत काही हरकती असल्याचे समजते. एल वॉर्डमध्ये एकूण १६ प्रभागांचा समावेश असून, त्यापैकी प्रत्येकी ३ प्रभाग इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय महिला आणि महिलांसाठी राखीव आहेत. तर, एक प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, उर्वरित सहा प्रभाग खुल्या प्रवर्गात मोडतात. आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर ५ ते २० आॅक्टोबरपर्यंत सूचना आणि हरकतींसाठी मुदत होती. दाखल हरकतींवर ५ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेतली जाणार असून, १८ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी पुनर्रचनेची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.यंदाच्या पुनर्रचनेत तब्बल ८० टक्के नगरसेवकांना हक्काचे मतदारसंघ गमवावे लागले. आता नव्याने वॉर्डचा शोध आणि नव्याने मतदारांपर्यंत पोहोचायची कसरत करावी लागणार असल्याची भावना अनेक नगरसेवकांनी व्यक्त केली होती.