Join us

आणखी ५० वॉर्डांत सेना-काँग्रेस समझोता

By admin | Published: February 15, 2017 5:04 AM

मुंबईतील ४२ वॉर्डांमध्ये एकमेकांच्या सोयीचे उमेदवार देणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने आता आणखी ५० वॉर्डांमध्ये गुप्त समझोता

मुंबई : मुंबईतील ४२ वॉर्डांमध्ये एकमेकांच्या सोयीचे उमेदवार देणाऱ्या शिवसेना आणि काँग्रेसने आता आणखी ५० वॉर्डांमध्ये गुप्त समझोता केला असल्याचा आरोप शिक्षणमंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी आज पत्रपरिषदेत केला. ते म्हणाले की, काँग्रेस-शिवसेनेने एकमेकांना ही व्हॅलेंटाइननिमित्त भेट दिली आहे. १० प्रभागांमध्ये शिवसेनेने काँग्रेससाठी प्रचार थंड केला आहे तर त्या मोबदल्यात काँग्रेसने ४० प्रभागांमध्ये शिवसेनेला ‘वॉक ओव्हर’ दिल्याचे प्रचारात जाणवत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त बैठक होऊन ही देवाणघेवाण झाली. काही खासगी गुप्तचर एजन्सीकडून ही माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या संपत्तीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे सांगून तावडे यांनी याबाबतची यादीच पत्रपरिषदेत सादर केली. काही नगरसेवकांच्या संपत्तीमध्ये दोन हजार पटीने वाढ होऊन त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत, असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईच्या विकासाचे मुद्देच शिल्लक नाहीत. गेल्या पाचपंचवीस वर्षांत वैशिष्ट्यपूर्ण काही केले असेही सांगण्यासारखे नाही. त्यामुळे ते राम मंदिर, सैनिकांचे जेवण, उत्तर प्रदेशातील जाहीरनामा अशा गैरवाजवी मुद्द्यांवर बोलत सुटले आहेत. त्यांनी मुंबईच्या विकासाचे व्हिजन मांडावे, असे आव्हान तावडेंनी दिले. (विशेष प्रतिनिधी)