सेना-मनसेचे वाय-फाय युध्द
By admin | Published: July 16, 2014 01:14 AM2014-07-16T01:14:17+5:302014-07-16T01:14:17+5:30
शिवाजी पार्क परिसरात सार्वजनिक वाय-फाय सुविधा पुरविण्याच्या प्रश्नावरुन आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कुरघोडीचे आणि श्रेयाचे राजकारण रंगले.
मुंबई : शिवाजी पार्क परिसरात सार्वजनिक वाय-फाय सुविधा पुरविण्याच्या प्रश्नावरुन आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कुरघोडीचे आणि श्रेयाचे राजकारण रंगले.
मनसेच्यावतीने आज शिवाजी पार्क परिसरात मोफत वाय-फाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि कुटुंबियांच्या उपस्थित ही सेवा सुरु करण्यात आली. शिवाजी पार्कच्या जॉगिंग ट्रॅकवर रोज ३ तासासाठी ही वाय-फाय सुविधा नागरीकांना वापरता येणार आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा वापरता येणार आहे. ही सुविधा वापरणा-यांचा मोबाईल नंबर मनसेच्या सर्व्हरवर नोंदला जाणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत संपर्कासाठी त्यांचा वापर करण्यात येईल, असे मनसेच्यावतीने सांगण्यात आले.
मात्र, मनसेने वाय-फाय सुविधा सुरु केल्यानंतर अवघ्या अर्धा तासात युवा सेनेने स्वत:च्या ‘वाय-फाय’सेवेचा दावा ठोकला. युवासेना युवांसाठी म्हणत मोबाईलचे ‘वाय-फाय’ कनेक्शन तपासण्याचे आवाहन केले. शिवसेनादादर हा पासवर्ड वापरुन ही सेवा दिवसभरासाठी वापरता येणार असल्याचा दावा युवासेनेने केला. विशेष म्हणजे, शिवाजी पार्कात खड्डे खणता येणार नाहीत, अशी भूमिका घेत मुंबई महापालिकेने मनसेच्या वाय-फायला परवानगी नाकारली होती. यानंतर ‘एरीयल राऊटर’चा वापर करुन मनसेने ही सेवा सुरु केली. (प्रतिनिधी)