फेरीवाला मुद्दय़ावरून सेना-मनसेत ‘सामना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:06 AM2017-11-13T01:06:12+5:302017-11-13T01:12:24+5:30
मुंबई शहर, उपनगर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाला मुद्दय़ावरुन शिवसेना आणि मनसेत सामना रंगण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रश्नी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. मात्र आता शिवसेना फेरीवाल्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार आहे.
मनोहर कुंभेजकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर, उपनगर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाला मुद्दय़ावरुन शिवसेना आणि मनसेत सामना रंगण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रश्नी शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती. मात्र आता शिवसेना फेरीवाल्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरणार आहे. मुंबई फेरीवाला सेना या संघटनेने फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष अशोक देहेरे यांनी दिली.
मुंबई फेरीवाला सेना ही शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेशी संलग्न असलेली नोंदणीकृत संघटना आहे. या संघटनेने फेरीवाल्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई फेरीवाला सेना या संघटनेची बैठक गोरेगाव पूर्व येथील सन्मित्र शाळेत रविवारी झाली. फेरीवाल्यांवर सध्या होत असणारी कारवाई थांबवून अधिकृत फेरीवाल्यांना तातडीने पर्यायी जागा द्यावी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली फेरीवाल्यांवर होणारी कारवाई थांबवावी, मुंबईत धंदा करणार्या सर्व फेरीवाल्यांना परवाना देण्यात यावा, फेरीवाल्यांकडून पोलीस घेत असलेली १२00 रुपयांची देण्यात येणारी पावती रद्द करावी, अशा मागण्या या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. मुंबईतील फेरीवाल्यांचा २000 साली सर्व्हे करण्यात आला होता. २0१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हॉकर्स झोनसंदर्भात निर्णय घेतला होता. मनसेने सुरू केलेल्या आंदोलनानंतर सध्या अधिकृत फेरीवाल्यांवरही महानगरपालिका प्रशासन कारवाई करत आहे. यात अनेक मराठी फेरीवाले आहेत. त्यांचे रोजीरोटीचे साधनच हिरावून घेतले जात आहे. या फेरीवाल्यांचे जगणे असह्य झाल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बाजूने लढा देणार असल्याची भूमिका शिवसेनाप्रणीत संघटनेने मांडली आहे.
एल्फिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याच्या मागणीसाठी मनसेने संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर फेरीवाल्यांच्या सर्मथनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतल्याने मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. आता अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेच्या मुंबई फेरीवाला सेना या संघटनेने घेतल्याने भविष्यात शिवसेना आणि मनसेमध्ये ‘सामना’ रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
९९ हजार अधिकृत फेरीवाले
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २0१४ पर्यंत ९९,४३५ अधिकृत फेरीवाले आहेत. सुप्रीम कोर्टाचा आताचा निर्णय काहीही असला व आता हे नोंदणीकृत फेरीवाले जरी रेल्वे स्टेशनच्या परिसरात निर्धारित अंतराच्या आत व्यवसाय करत असले तरी त्यांच्यावर कारवाई होणे बेकायदेशीर आहे.
पर्यायी जागा द्या
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व्हे झालेल्या अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेने पर्यायी जागा द्यावी. पुरावे आहेत, अशा फेरीवाल्यांना प्रथम जागा द्यावी, नंतरच त्यांना हटवावे. यासंदर्भात लवकरच पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांची भेट घेणार आहोत. शिवसेनेला आम्ही याची कल्पना दिलेली नाही. तथापि, शिवसेना नेतृत्वालाही आम्ही आमची भूमिका पटवून देणार आहोत.
- अशोक देहेरे, अध्यक्ष, मुंबई फेरीवाला सेना
उपर्यांसाठी खटाटोप का?
या फेरीवाल्यांचे पोशिंदे कोण आहेत? हा खटाटोप उपर्यांसाठी असल्याचे नीट समजून घ्या, हफ्ता कोणाचा अडतो आहे? ही आजची शिवसेना कोणाची आहे? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
- वीरेंद्र जाधव, गोरेगाव विभागाध्यक्ष, मनसे
शिवसेनेचा संबंध नाही
मुंबई फेरीवाला सेनेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. ही अधिकृत शिवसेनाप्रणीत संघटना नाही.
- संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना