नवी मुंबईत सेना फुटली

By admin | Published: April 15, 2015 02:04 AM2015-04-15T02:04:02+5:302015-04-15T02:04:02+5:30

पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा आणि माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंवर आरोप करून स्वतंत्र आघाडी करून पक्षाविरुद्धच एल्गार पुकारला आहे.

Army in Navi Mumbai exploded | नवी मुंबईत सेना फुटली

नवी मुंबईत सेना फुटली

Next

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ४१ बंडखोर उमेदवारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा आणि माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंवर आरोप करून स्वतंत्र आघाडी करून पक्षाविरुद्धच एल्गार पुकारला आहे. पक्षश्रेष्ठींनी उपऱ्यांना तिकीट वाटप केल्याने ही आघाडी स्थापन केल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. या आघाडीमुळे शिवसेनेचे नुकसान होणार असून, त्याला स्थानिक नेते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
या आघाडीचे नेतृत्व उप-जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, ऐरोली विभागाचे शहर प्रमुख सुरेश म्हात्रे, भोलानाथ तुरे, प्रफुल्ल म्हात्रे हे करीत आहेत. बंडखोरांची समजूत काढली असून ते सर्वजण माघार घेतील, हा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा दावा या आघाडीमुळे फोल ठरला आहे. स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावंतांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल, असे नाहटांनी सांगितले. मात्र त्या विरुद्ध जाऊन त्यांनी तिकीट वाटप केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्यामुळे बंडखोरी करून ही आघाडी शिवसेनेच्या उपऱ्या उमेदवारांना टक्कर देणार असल्याचे ते म्हणाले. यात शिवसेनेचे नुकसान असून त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विजय नाहटा व विजय चौगुले हे जबाबदार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाहटांनी प्रत्येकाला कामाला लागा, असे सांगून लाखो रुपये खर्चून खेळ मांडियेला कार्यक्रम करायला सांगितला. मात्र अशांचीही उमेदवारी कापून त्यांनी अनेकांचा खेळखंडोबा केल्याचाही आरोप यावेळी बंडखोरांनी केला. तसेच जिल्हाप्रमुख विजय चौगुले नको त्या गोष्टीत अडकल्याने शिवसैनिकांची लाजिरवाणी अवस्था झाली होती. अशावेळी नाहटांकडून प्रत्येकाला चांगल्या अपेक्षा होत्या. मात्र उमेदवारी वाटपात त्यांनीही कोणाला विश्वासात न घेता अपेक्षाभंग केला. तर चौगुले भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगत असतानाच त्यांची नाशिक येथे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र त्यानंतरही पुन्हा पक्षश्रेष्ठींना ते कसे मान्य झाले, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. या आघाडीचे नेतृत्व करणारे कोणीही निवडणूक लढवत नसून ते केवळ बंडखोरांचे मनोबल वाढवण्याचे काम करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

शेवंती सोंडे, लक्ष्मण भेरे, समीर पाटील, बापू पोळ, जयश्री सोनावणे, सुदर्शन जिरगे, राजेश मढवी, सुरेखा भिलारे, सुखदेव जाधव, मदन पाटील, नामदेव जगताप, शेखर पाटील, सीमा गायकवाड, रोहिणी माने, ललिता मढवी, राजश्री शेवाळे, संदीप राजपूत, कल्पना गायकवाड, राजेंद्र आव्हाड, हरिभाऊ म्हात्रे, श्वेता म्हात्रे, किशोर विचारे, योगेश हेळकर, दर्शन भणगे, सुरेंद्र मंडलिक, सुवर्णा चव्हाण, संतोष भोर, शुभदा पाटे, सुनील हुंडारे, मनिषा गिरप, मनीषा मोरे, प्रीतेश पाठारे, तेजस्वी कोळी, संतोष दळवी, सरोज ठाकूर, सुजाता गुरव, राजरतन शिंदे, कांचन रामाणे, गणेश नाईक, महादेव पाटील हे आता अपक्ष लढणार आहेत.

च्तिकीट वाटपाचे अधिकार असलेल्यांनी पक्षाचे सदस्य नसलेल्यांना सुद्धा उमेदवारी दिली असून, काही जागांवर भाजपालाही उमेदवार पुरवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
च्चौगुले यांच्याच कुटुंबात ८ तर आयात केलेल्या नगरसेवकांना प्रत्येकी २ ते ४ तिकिटे देण्यात आल्याचाही आरोप उप-जिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे यांनी केला. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी अन्यायाविरोधात हे बंड पुकारल्याचे ते म्हणाले.

Web Title: Army in Navi Mumbai exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.