Join us

'लष्कर'ने केला होता बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न - डेव्हिड हेडली

By admin | Published: March 24, 2016 8:36 AM

'लष्कर-ए-तोयबा'ने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक कबुली डेव्हिड हेडलीने उलटतपासणीदरम्यान दिली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'ने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक खुलासा मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या खटल्याप्रकरणातील माफीचा साक्षीदार
असणा-या डेव्हिड हेडलीने केला. फेब्रुवारी महिन्यात त्याची विशेष सरकारी वकिलांनी तपासणी घेतली होती, त्यानंतर बुधवार २३ मार्चपासून त्याची उलटतपासणी सुरू असून, आज (गुरूवार) तपासणीच्या दुस-या दिवशी त्याने अनेक महत्वाच्या बाबींवर खुलासे केले.
' साजिद मीरच्या सांगण्यावरून मी दोनवेळा शिवसेना भवनला भेट देऊन तेथील पाहणी केली होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे (लष्करचे) लक्ष्य होते. माझ्याकडे तपशीलवार माहिती नाही, पण हो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण ते त्यातून बचावले. त्या हल्लेखोराला अटकही करण्यात आली होती, मात्र काही दिवसातच तो पोलिस कोठडीतून पसार झाला' असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला. 
 
यापूर्वीही हेडलीने साक्षीदरम्यान खळबळजनक माहिती दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजाराम रेगे यांच्याद्वारे मन वळवून अमेरिकेत बोलवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) होता, अशी खळबळजनक माहिती त्याने साक्षीदरम्यान विशेष न्यायालयाला दिली. बाळासाहेब ठाकरे व त्यांचा मुलगा अमेरिकेत आल्यानंतर त्यांची ‘काळजी’ अमेरिकेतील डॉ. तहव्वूर राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य घेणार होते, अशीही माहिती हेडलीने न्यायालयाला दिली.
 
हेडलीच्या उलटतपासणी दरम्यानचे महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- साजिद मीरने दिलेल्या सूचनांप्रमाणे मी शिवसेना भवनला दोनदा भेट दिली होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे (आमचे) लक्ष्य होते, लष्कर-ए-तोयबाने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
 
- बाळासाहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ते बचावले, हल्लेखोराला अटक करण्यात आली होती मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
 
- माझी बायको फैजासोबत मी एकदा ताजमहालचे फोटो काढण्यासाठी गेलो होतो, मात्र तिला फोटो काढण्यामागचा उद्देश माहित नव्हता.
 
- मी कसाबला ओळखत नसल्याने तो चांगला होता की वाईट माहित नाही, मात्र त्याने जे काही केल ते चुकीचं होतं.
 
- 26/11 हल्ला ही चांगली घटना नव्हती, मला यासाठी अगोदरच दोषी ठरवलेलं आहे.
 
- 26/11 नंतर भारतावर पुन्हा हल्ला करण्याची मी योजना आखत होतो, मात्र त्यावेळी मला लष्कर-ए-तोयबाने नव्हे तर अल-कायदाकडून सूचना देण्यात आल्या होत्या.
 
-  कराचीमधील लष्कर-ए-तोयबाच्या कंट्रोल रुममध्ये मी कधीच गेलेलो नाही.
 
- इलियास कश्मिरी याने दौ-याचा खर्च केला होता, या दौ-याचा खर्च 1 लाखांच्या (पाकिस्तानची चलन) आसपास होता.