‘अग्निसुरक्षे’साठी स्वयंसेवकांची फौज

By admin | Published: April 15, 2016 01:53 AM2016-04-15T01:53:47+5:302016-04-15T01:53:47+5:30

काळबादेवीमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईकरांनाच सुरक्षेचे धडे देण्याचा निर्धार केला आहे़ अग्निशमन सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मुंबईत असे दरमहा

The army of volunteers for 'Fire safety' | ‘अग्निसुरक्षे’साठी स्वयंसेवकांची फौज

‘अग्निसुरक्षे’साठी स्वयंसेवकांची फौज

Next

मुंबई : काळबादेवीमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेने मुंबईकरांनाच सुरक्षेचे धडे देण्याचा निर्धार केला आहे़ अग्निशमन सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मुंबईत असे दरमहा १२०० स्वयंसेवक तयार करण्यात येणार आहेत़ या स्वयंसवेकांच्या नोंदणीसाठी आजपासून स्वतंत्र हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे़
१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईमधील व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या बोटीत मोठा स्फोट झाला. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले. या दिनाची स्मृती म्हणून १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. जवानांना श्रद्धांजली वाहून या सप्ताहाचा आरंभ भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या
प्रांगणात आयुक्त अजय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
आला़
आयुक्तांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून विशेष हेल्पलाइनवर संपर्क साधत या नवीन सेवेचा प्रारंभ केला़ चिंचोळे मार्ग आणि वाहतुकीच्या कोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचण्यास अनेक वेळा अग्निशमन दलास विलंब होतो़ या अवधीत नागरिकांना आपली व आपल्या आप्तेष्टांची सुरक्षा करता आल्यास अनेक जीव वाचू शकतील, असा पालिकेला विश्वास आहे़ म्हणून स्वयंसेवकांच्या माध्यमातून मुंबईकरांना सज्ज करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला़ (प्रतिनिधी)

असे तयार होणार स्वयंसेवक
शहर व उपनगरांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे सहा पथके तयार करण्यात आली आहेत. अग्निशमन दलाचे हे पथक दरमहा १२०० जणांना प्रशिक्षित करणार आहे़ असे सहा महिन्यांमध्ये सात हजार स्वयंसेवक तयार होतील़ या स्वयंसेवकांना प्राथमिक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. त्यानंतर यातील निवडक स्वयंसेवक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर वॉर्डात फिरून प्रत्येक सोसायटीला प्रशिक्षित करणार आहेत़

यासाठी हवे स्वयंसेवक
अग्निशमन दलामध्ये तीन हजार जवान व अधिकारी आहेत़ तर मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी असून दरवर्षी चार हजारांहून अधिक ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडतात़ त्यामुळे अग्निशमन दलावरील ताण वाढला आहे़ त्याचबरोबर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत जीवित व वित्तहानीची शक्यता अधिक असते़ अशा वेळी त्या त्या विभागातील स्वयंसेवक देवदूत ठरू शकतात़

हेल्पलाइन कशासाठी?
दुर्घटनेविषयी माहिती देण्यासाठी १०१ ही अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे़ याव्यतिरिक्त अग्निसुरक्षेविषयक योग्य ती माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचावी, अग्निशमन कायदा, ना हरकत प्रमाणपत्र, परवाने याबाबत माहिती देण्यासाठी १८००१२३३४७३ ही हेल्पलाइन आजपासून सुरू करण्यात आली आहे़ सकाळी १०़३० ते ४़३० या वेळेत ही हेल्पलाइन सुरू असेल़ या हेल्पलाइनवर संपर्क करून इच्छुक नागरिक आपल्या नावाची नोंदणी स्वयंसेवक म्हणून करू शकतात़

Web Title: The army of volunteers for 'Fire safety'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.