Join us  

सेना कुर्ल्यातील गड राखणार का, गडाला खिंडार पडणार?

By admin | Published: February 23, 2017 6:50 AM

महापालिका निवडणुकींसाठी मतदारांनी आपला हक्क बजावला असून, सर्वच राजकीय

मुंबई : महापालिका निवडणुकींसाठी मतदारांनी आपला हक्क बजावला असून, सर्वच राजकीय पक्षांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. सर्वात मोठा वॉर्ड समजल्या जाणाऱ्या कुर्ल्यात ‘महानिकाला’ची प्रतीक्षा मतदारांप्रमाणे उमेदवारांनाही आहे. परिणामी, येथे सेना गड राखणार की गडाला खिंडार पडणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील एल वॉर्ड परिसरात सेनेचे १६ उमेदवार आखाड्यात आहेत. १६८ ‘डॉक्टर वॉर्ड’मधून विजयाचा ‘चौकार’ लगावण्यासाठी अनुराधा पेडणेकर यांच्यासह सईदा खान यांनी प्रयत्न केले असून, मतदार कोणाच्या पारड्यात ‘दान’ टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. सर्वात जास्त ३१ उमेदवार असलेल्या प्रभाग १६४ मध्ये एस. अण्णामलाई आणि प्रभाग १६६ मध्ये मनाली तुळसकर यांच्याकडेही मतदारांचे लक्ष आहे. प्रभाग १७१ महिला आरक्षणामुळे विजय तांडेल यांची पत्नी सानवी तांडेल उमेदवार असल्याने, तांडेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग १६१ मध्ये विजयेंद्र शिंदे यांच्या कामगिरीवर कुर्ल्यात सेनेचे अस्तित्व आहे की नाही? याचे चित्रही गुरुवारी स्पष्ट होईल.प्रभागात राष्ट्रवादी पक्षासह एमआयएम पक्षानेही आपले उमेदवार दिल्याने, मतविभागणी अटळ आहे. मात्र, याचा फटका नक्की कोणाला बसतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्रभागाच्या फेररचनेमुळे बहुतांशी विद्यमानांचे प्रभाग विभागले गेले. परिणामी, सेना गड राखणार की विविध पक्ष गडाला खिंडार पाडणार? हा प्रश्न गुरुवारी निकाली लागेल. (प्रतिनिधी)एल वॉर्डमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि एमआयएमने ‘मातब्बर’ उमेदवार उभे केले आहेत. एल वॉर्डमधील अनेक प्रभाग शिवसेनेचे गड म्हणून ओळखले जातात. मात्र शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्ररित्या निवडणुक लढवल्याने मतांचे पारडे कोणाकडे झुकते? हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.एल वॉर्डमध्ये विमानतळालगतच्या झोपड्यांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही. कित्येक लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न पुर्णत: सुटलेला नाही. या निवडणुकीतही उमेदवारांनी विमानतळालगतच्या झोपड्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. परिणामी आता हे आश्वासन किती पुर्ण होते? याकडेही मतदारांचे लक्ष लागून राहणार आहे.