उरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सिडको हद्दीत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर बुलडोझर फिरविण्याच्या कारवाईच्या भूमिकेवर ठाम असलेल्या सिडकोविरोधात प्रकल्पग्रस्तांनी संघर्षाची जोरदार तयारी चालविली आहे. सिडकोची कारवाई रोखण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या संरक्षणासाठी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील ५०० युवकांची फौज तयार करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सिडको विरोधात प्रकल्पग्र्रस्त असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.बंदुकीच्या जोरावर १९८४ साली नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या जमिनी एकरी १५ हजारांनी संपादित केल्या. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावून त्याच्याच डोक्यावर विकासाचा नारळ फोडून २१ व्या शतकातील नवी मुंबई शहर वसविण्याच्या नावाखाली लाखो कोटींचे साम्राज्य उभे केले. याचा सर्वाधिक फायदा सिडको आणि परप्रांतीयांना झाला आहे. ज्या भूमिपुत्रांनी कवडीमोल भावाने जमिनी दिल्या, मात्र या गावात आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सिडकोची कारवाई रोखण्यासाठी काय करता येईल, याबाबत गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची गव्हाण येथे बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रघुनाथ घरत, पांडुरंग घरत, अरुण भगत, वसंत म्हात्रे, रत्नप्रभा घरत, सचिन घरत यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सिडकोविरोधात युवा प्रकल्पग्रस्तांची फौज
By admin | Published: June 12, 2015 5:54 AM