सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले?
By admin | Published: August 31, 2016 05:50 AM2016-08-31T05:50:57+5:302016-08-31T05:50:57+5:30
महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा बार उडविण्यास सत्ताधाऱ्यांकडून सुरुवात झाली असताना शिवसेना पक्षप्रमुखांचे महालक्ष्मी
मुंबई : महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा बार उडविण्यास सत्ताधाऱ्यांकडून सुरुवात झाली असताना शिवसेना पक्षप्रमुखांचे महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय थीम पार्क उभारण्याचे स्वप्न हवेतच राहण्याची लक्षणे आहेत. मित्रपक्षासमवेत राज्यातील सत्तेत सहभागी असतानाही त्याबाबतचा प्रस्ताव रेंगाळला आहे. पालिका प्रशासनाने मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत ही बाब शासनाकडे प्रलंबित असल्याचे स्पष्ट केल्याने सेनेचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.
मे़ गॅलॉप्स या उपाहारगृहाला पोटभाडेकरू म्हणून रेसकोर्सची जागा देऊन मे़ रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब या भाडेकरूने पालिकेच्या कराराचा भंग केला़ यामुळे त्याचा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आल्यानंतर युतीच्या विरोधामुळे पालिकेने टर्फ क्लबच्या कराराचे नूतनीकरण केलेले नाही़ या रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला होता़ राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर हा प्रस्ताव मार्गी लागेल, अशी सेनेला आशा होती़ मात्र राज्य सरकारला दोन वर्षे होत आली तरी तो अद्याप प्रलंबित राहिला आहे.
मित्रपक्षाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भाजपानेच खोडा घातला गेल्याची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे रेसकोर्सची जागा अद्याप ताब्यात आलेली नाही़ त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत मध्यवर्ती उद्याने उभारण्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याचा दबाव शिवसेनेने आयुक्तांवर आणण्याचा प्रयत्न केला होता़ मात्र रेसकोर्सची जमीन पालिका
आणि राज्य शासन दोघांची
असल्याने यावर एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत प्रशासनाने मंगळवारी व्यक्त केल्यामुळे शिवसेनेचा हा प्रयत्नही फेल
गेला़
महालक्ष्मी रेसकोर्सचा ५ लाख ९६ हजार ९५३ चौ़ मीटरचा भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा असून, २ लाख ५८ हजार २४५ जागेवर पालिकेचा हक्क आहे़
१८८३मध्ये कुश्रो एन वाडिया यांनी ही २२५ एकर जागा पालिकेला दान केली़ मेलबर्नमधील कोलफिल्ड रेसकोर्सच्या धर्तीवर महालक्ष्मी रेसकोर्स तयार झाले़
१९१४मध्ये पालिकेने ही जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ९९ वर्षांच्या भाडेकरारावर दिली़ हा करार ३१ मे रोजी संपुष्टात आल्यानंतर ३० वर्षांची मुदतवाढ मिळण्याची विनंती क्लबचे अध्यक्ष कुश्रो धुनजीभॉय यांनी केली आहे़
राज्य सरकार आणि पालिका दोघांचाही या जमिनीवर हक्क आहे़ त्यामुळे पालिकेने आपल्या वाट्याची जमीन घेऊन उपयोग नाही़ त्यामुळे दोघांनी एकत्रित निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सुधार समितीच्या बैठकीत मंगळवारी व्यक्त केले़
विरोधकांच्या टोल्याने शिवसेना घायाळ
थीम पार्क ही केवळ निवडणुकीपुरतीच घोषणा असून प्रत्यक्षात काही नाही, असा टोला विरोधी पक्षांनी लगावला़ यावर खवळलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी थीम पार्क होणार, ती काय जादूची कांडी नाही़़ भूखंड परत घेण्यास वेळ लागतो, अशी सारवासारव केली़