Join us

अर्णब गाेस्वामींना दोषारोपपत्राला आव्हान देता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:34 AM

उच्च न्यायालयाची परवानगी : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी दाखल केलेल्या दोषारोपपत्राला आव्हान ...

उच्च न्यायालयाची परवानगी : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी दाखल केलेल्या दोषारोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिली.

अलिबाग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषारोपपत्राची दखल घेतल्याची माहिती गोस्वामी यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्या.एस.एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. त्यानंतर, त्यांनी गोस्वामी यांना दोषारोपपत्राला आव्हान देण्याची परवानगी दिली.

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी व दोन जणांना अलिबाग पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी अटक केली. पोलिसांनी केलेले आरोप फेटाळत गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.

९ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ११ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांनी अर्णब गोस्वामी व अन्य दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषारोपपत्राची दखल घेतल्याने, आम्हाला ते रेकॉर्डवर आणून त्यास आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी, असे पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्यांना परवानगी दिली.

* ६ जानेवारी रोजी सुनावणी

दोन वर्षे जुन्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याबद्दल आणि दोषारोपपत्र दाखल केल्याने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांची विनंती मान्य करत, अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाला गोस्वामी यांना दोषारोपपत्राची प्रत देण्याचे निर्देश देत या याचिकेवर ६ जानेवारी रोजी सुनावणी ठेवली.

-----------------