Join us

अर्णब गोस्वामी 'अभिनेता', रोहित पवारांचं भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर

By महेश गलांडे | Published: November 04, 2020 5:17 PM

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आणीबाणी 1977 मध्येच संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे.

ठळक मुद्देसरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही

मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरून भाजपा नेत्यांकडून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. याबाबत कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीही भाजपावर बाण चालवले आहेत. आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलंय. 

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आणीबाणी 1977 मध्येच संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. आणीबाणीला समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर याच मानसिकतेचं प्रदर्षण करत आहेत. सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा हा प्रयत्न घातक, असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. आमदार रोहित पवार यांनी या टीकेला उत्तर देताना अर्णब गोस्वामीला अभिनेता म्हटलंय. तसेच, इतर पत्रकारांवरील कारवाईवेळी आणीबाणी नाही का आठवतं, असा प्रश्नही रोहित यांनी विचारलाय. 

सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं. पण याच 'अभिनेत्या'मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप,'सोशल मीडिया हब'सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न/पत्रकारांचा हक्क हिरावणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा?, असे ट्विट रोहित यांनी केलं आहे. 

संजय राऊत अन् जितेंद्र आव्हाडांचं उत्तर 

'महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,' असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अर्णब यांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. 'ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामींना अटक; रायगड पोलिसांची कारवाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे ५ वाजता मुंबई पोलिसांच्या सीआययु प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

टॅग्स :रोहित पवारअर्णब गोस्वामीअटकपोलिस