मुंबई - लीक झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमधील माहितीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्अॅप चॅटमध्ये काही मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता या चॅटबाबच अजून एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अर्णब गोस्वामी यांना बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकची कुणकूण आधीच लागली होती. असा दावा लीक झालेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावरून करण्यात आला आहे.१४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधीच काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती आपल्या चॅटमधून दिली होती. मिळत असलेल्या माहितीनुसार २३ फेब्रुवारीच्या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी काहीतरी मोठे घडणार असल्याची माहिती पार्थो दासगुप्ता यांना दिली होती.