ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अर्णबचं पूर्वीचं चॅनल टाइम्स नाऊने अर्णबविरोधात कंटेंट चोरीचा आरोप केला आहे. तसेच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकार प्रेमा श्रीदेवी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 मे रोजी लॉन्च झाल्यापासून हे चॅनल चर्चेत आहे. पहिल्या दिवशी ऑडिओ टेप्सच्या माध्यमातून राष्ट्रीय जनता दल प्रमूख लालूप्रसाद यादव हे तुरूंगात असलेल्या शहाबुद्दीन याच्याशी एका पोलीस अधिका-याला हटवण्याबाबत चर्चा करत असल्याचा दावा करून रिपब्लिकन टीव्हीने खळबळ उडवून दिली होती. तर सुनंदा पुष्कर गुढ मृत्यू प्रकरणीही एक ऑडिओ टेप ऐकवून शशी थरूर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या ऑडिओ टेपमध्ये रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकार प्रेमा श्रीदेवी आणि सुनंदा पुष्कर यांच्यातील ऐकवलं गेलं.
ज्यावेळी प्रेमा श्रीदेवी आणि सुनंदा पुष्कर यांची चर्चा झाली त्यावेळी प्रेमा श्रीदेवी या टाइम्स नाऊमध्ये पत्रकार होत्या. त्यामुळे या दोन ऑडिओ टेप्सवरून टाइम्स नाऊची प्रमुख कंपनी बीसीसीएलने अर्णव यांच्यावर कंटेंट चोरीचा आरोप केला आहे. बीसीसीएलने मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्णव आणि प्रेमा श्रीदेवी यांच्याविरोधात कॉपीराइट्सचं उल्लंघन केल्याप्रकऱणी FIR दाखल केला आहे. BCCL ने सेक्शन 378, 379, 403, 405 नुसार आयपीसी कलम 406, 409, 411, 414 418 आणि आयटी ऐक्ट, 2000 चं कलम 66-B, 72 आणि 72-A अंतर्गत तक्रार करण्यात आली आहे.
अर्णब आणि श्रीदेवी टाइम्स समूहाचे कर्मचारी असतानापासून दोघांकडे त्या ऑडीओ क्लिप्स होत्या, अर्णब आणि श्रीदेवी यांनी जाणूनबुजून टाइम्स नाऊ वाहिनीच्या मालमत्तेचा गैरवापर केला असल्याचं बीसीसीएलने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.