Join us

Arnab Goswami: 'अर्णब गोस्वामींना भेटायला गेल्यावर पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं'; सोमय्यांचा आरोप

By मुकेश चव्हाण | Published: November 04, 2020 5:30 PM

भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षात जुंपली आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला. याचदरम्यान भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकलं असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे, हे पाहण्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनला आलो होतो. मात्र पोलिसांनी मला उचलून बाजूला फेकलं. कोणताही नागरिक साधं लांब उभं राहून पाहूदेखील शकत नाही. पोलिसांच्या कामात अडथळा आणला नसतानाही ही कोणती दादागिरी आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

अर्णब गोस्वामींना अटक; रायगड पोलिसांची कारवाई

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे ५ वाजता मुंबई पोलिसांच्या सीआययु प्रमुख सचिन वाझे यांच्या पथकासह रायगड पोलीस त्यांच्या वरळी येथील घरी गेले होते. दीड तास पोलिसांशी हुज्जत घातल्यानंतर सात वाजता गोस्वामींना अटक केली. आधी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

भाजप नेत्यांचं ठाकरे सरकारवर शरसंधान-

चंद्रकांत पाटील म्हणतात-

याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार म्हणाले-

एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

जावडेकर म्हणतात-

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. जावडेकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, मुंबईमध्ये पत्रकारितेवर जो हल्ला झाला तो निंदणीय आहे, आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची ही कारवाई आहे. आम्ही याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत अन् जितेंद्र आव्हाडांचं उत्तर- 

'महाराष्ट्राच्या कायद्याचं राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेनं कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,' असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील अर्णब यांच्या अटकेचं समर्थन केलं आहे. 'ज्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावून नेला देवासमान आई हिरावून नेली अशा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे हेच कोणत्याही कायद्याचे राज्य असलेल्या शासनाचे कर्तव्य होय,' असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :किरीट सोमय्याभाजपाअर्णब गोस्वामीअन्वय नाईकमहाराष्ट्र सरकारपोलिस