Arnab Goswami :अर्णब गोस्वामी दाेन दिवस काेठडीतच; तत्काळ दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 02:55 AM2020-11-08T02:55:30+5:302020-11-08T06:55:27+5:30
सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने शनिवारीच लेखी आदेश देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले
मुंबई : वास्तुविशारदाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने शनिवारी राखून ठेवला. न्यायालयाने गोस्वामी यांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला. त्यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली.
सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने शनिवारीच लेखी आदेश देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. गोस्वामी यांच्यातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्याचा आग्रह धरला. मात्र, उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास असमर्थता व्यक्त केली. ‘आम्ही लवकरात लवकर निकाल देऊ. तुमची याचिका इथे प्रलंबित असली तरी तुम्हाला (गोस्वामी व अन्य आरोपी) सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा आहे’, असे न्यायालयाने म्हटले.
सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला तर न्यायालयाने चार दिवसांत हा अर्ज निकाली काढावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अलिबाग सत्र न्यायालयाला दिला. गोस्वामी सहआरोपी नितीश सारडा आणि फिरोज शेख यांनी अंतरिम जामीन मिळावा व गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयात याचिका केली आहे. शनिवारी न्यायालयाने केवळ अंतरिम जामिनावरीलच युक्तिवाद ऐकला. गुन्हा रद्द (पान ३ वर)